Balbharati Marathi Textbook Pudhari
पुणे

Balbharati Marathi Textbook: चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात भाषिक कौशल्य विकासावर भर; बालभारतीचे नवे पुस्तक सादर

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विचारशक्ती, सर्जनशीलता व संवादकौशल्य वाढविण्याचा प्रयत्न; मात्र व्याकरण व लेखन सराव वाढवण्याची गरज तज्ज्ञांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. हे पुस्तक केवळ वाचनापुरते मर्यादित राहणार नसून विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, कल्पनाशक्ती, संवादकौशल्य, मूल्यसंस्कार आणि सर्जनशीलता विकसित होणार आहे. विद्यार्थ्यांना भाषा शिकण्यासोबतच विचार करणे, संवाद साधणे, सर्जनशीलतेने व्यक्त होणे आणि समाजाशी जोडण्याचा बालभारतीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना यंदा देण्यात येणार आहे. चौथीच्या मराठीच्या पुस्तकाचे चार भागात वर्गीकरण करण्यात आले असून २० प्रकरणांचा समावेश केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार केलेल्या या पुस्तकात कविता, कथा, संवाद, माहितीपर लेख, चरित्रपर लेखन, लोकसाहित्य, पर्यावरण, विज्ञान, संस्कृती आणि सामाजिक जाणीवा अशा विविध विषयांचा समावेश केला आहे. पुस्तकाची रचना विद्यार्थीकेंद्रित आहे.

विद्यार्थ्यांनी फक्त पाठांतर न करता समजून घेऊन शिकावे, स्वतः विचार मांडावेत आणि भाषेचा दैनंदिन जीवनात वापर करावा, यावर विशेष भर दिला आहे. प्रत्येक पाठानंतर आम्हाला हे समजले, विचार करा व सांगा, चर्चा करू या, लिहिते होऊ या, खेळू या शब्दांशी या कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला प्रबळ करण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची सुरुवातच ‘हीच आमुची प्रार्थना’ या कवितेने झालेली आहे. हीच आमुची प्रार्थना अन्‌ हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे, या काव्यपंक्तीमधून माणसाने नेमके काय करावे, हा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला आहे. सरावन मईन्यात, तिरंगा, आनंदी- आनंद गडे, बाभूळ, वासुदेव आला, फुलपाखरे, नाते जगाशी, सण आला पाडव्याचा, या कविता विद्यार्थ्यांना निसर्ग, देशभक्ती, फुलपाखरे, बाभळीचे झाड, गावात येणारा वासुदेव, भारतीय संस्कतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गुढीपाडवा सण याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

तर कौतुकाची थाप, आभाळातील फरकांड्या, पुस्तकांच्या सहवासात, डोंगरदादा या पाठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वैचारिक प्रबोधन करण्यात येणार आहे. आजोबांची अंगठी, माझा पतंग, माझे गाव, ग्रंथदिंडी या चित्रकथा आणि चित्रवर्णनातून विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला बळ दिले जाणार आहे. एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी हे पुस्तक परिपूर्ण असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कथालेखन, पत्रलेखन, बातमी लेखनासारखे प्रयोग गरजेचे

पुस्तकात एकतर व्याकरण कमी प्रमाणात आहे. ते वाढविणे गरजेचे आहे. शब्दसंग्रह देखील थोडाच आहे, त्याचबरोबर कथालेखन, पत्रलेखन, बातमी लेखनासारखे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये विचार करून लिहिण्याची कला वाढविणे गरजेचे आहे. मराठीच्या पुस्तकात आता कथा, कविता, चित्रकथा, चित्रवर्णनाच्या पलीकडे जाणे गरजेचे आहे. त्याबाबतीत या पुस्तकात काही उणिवा जाणवत असल्याचे मत पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT