Balbharati Pudhari
पुणे

Balbharati Diamond Jubilee: बालभारती हीरक महोत्सवाचा शुभारंभ; सहा दशकांचा शैक्षणिक प्रवास गौरवला

बालगंधर्व रंगमंदिरात 27 जानेवारीला मुख्य सोहळा, 60 निवडक मुखपृष्ठांचे विशेष प्रदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती स्थापनेच्या 60 व्या वर्षात पदार्पण करत असून, यानिमित्ताने बालभारती हीरक महोत्सवाचा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. दि. 27 जानेवारी 1967 रोजी स्थापन झालेल्या बालभारतीने गेल्या सहा दशकांत राज्यातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, मूल्ये आणि संस्कारांची दीपमाळ उजळवली आहे.

दर्जेदार, मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थिकेंद्रित पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीमुळे बालभारती ही केवळ एक संस्था न राहता, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा भक्कम कणा ठरली आहे. त्यामुळे बालभारतीचा हा हीरक महोत्सव म्हणजे शिक्षणाच्या परंपरेचा गौरव आणि भावी पिढ्यांसाठी नवे संकल्प घेण्याचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

या हीरक महोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे राहणार असून, दि. 27 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी बालभारती निर्मित विविध पुस्तकांचे प्रकाशन तसेच बालभारतीच्या गीताचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासोबतच बालभारतीच्या कवितांना सांगीतिक साज देणारा ‌‘माझी बालभारती‌’ हा संवाद कार्यक्रम सादर होणार आहे.

या सोहळ्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विद्या प्राधिकरणाचे संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक महेश पालकर, प्राथमिकचे संचालक शरद गोसावी, योजना विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‌‘बालभारती‌’च्या निवडक मुखपृष्ठांचे प्रदर्शन

दि. 25 ते 27 जानेवारी या कालावधीत बालभारतीच्या सहा दशकांच्या शैक्षणिक प्रवासाचे प्रतीक ठरलेल्या 60 निवडक मुखपृष्ठांचे विशेष प्रदर्शन बालगंधर्व कलादालन, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांनी केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कृती, मूल्ये आणि सौंदर्यदृष्टीही विद्यार्थ्यांच्या मनावर कशी कोरली, याचे दर्शन घडणार आहे. विविध काळातील मुखपृष्ठांमधून बदलते शैक्षणिक विचार, सामाजिक संदर्भ आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा प्रवास उलगडणार असून, हे प्रदर्शन बालभारतीच्या शैक्षणिक योगदानाची साक्ष देणारे ठरणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व कलादालन येथे होईल. त्यानंतर हे प्रदर्शन सर्वसामान्यांना पाहण्यासाठी मोफत उपलब्ध असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT