Physical Education Book Pudhari
पुणे

Physical Education Book: चौथीच्या ‘शारीरिक शिक्षण व निरामयता’ पुस्तकातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

खेळ, व्यायाम, योग, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयी रुजवण्याचा बालभारतीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: विविध खेळांची ओळख करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना देऊन निरोगी जीवनशैली, स्वच्छता, सुरक्षितता, शिस्त, व्यायाम आणि सकारात्मक सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न 'बालभारती'ने इयत्ता चौथीच्या 'शारीरिक शिक्षण व निरामयता' या नव्या क्रमिक पुस्तकातून केला आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 'शारीरिक शिक्षण व निरामयता' या पुस्तकात १० विभाग केले आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, खेळ, गाणी, संवाद, निरीक्षण आणि दैनंदिन जीवनातील सवयींच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ तंदुरुस्त बनविण्यापेक्षा निरोगी, शिस्तबद्ध, स्वावलंबी, जबाबदार आणि आनंदी नागरिक घडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अभ्यास, खेळ, स्वच्छता आणि चांगल्या सवयी यांचा समतोल साधत मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया या पुस्तकातून घालण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

नवीन खेळांची जोड अपेक्षित...

जागतिक पटलावर क्रीडा क्षेत्रात देश आजही फारच पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर विविध स्पर्धांमध्ये ज्या खेळांचा समावेश आहे. त्याची पायाभरणी चौथीच्या या पुस्तकात होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याच पारंपरिक खेळांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन खेळांची जोड अपेक्षित असल्याचे मत पुस्तक परीक्षणा साठी दिलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुस्तकात नेमके आहे काय?

पुस्तकात साधारण दहा विभाग करण्यात आले आहेत. मूलभूत हालचाली या विभागापासून पुस्तकाची सुरुवात केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शरीर सक्रिय ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले असून, जागेवर, जागा बदलत, साहित्यांसह हालचाली कशा करायच्या याविषयी माहिती देण्यात आली आहे. विविध व्यायाम या विभागात सामान्य व्यायाम, धाडसी व्यायाम, सूर्यनमस्काराचे धडे देण्यात आले आहेत. कवायत संचालनामध्ये विद्यार्थ्यांना कवायतीचे विविध प्रकार शिकवण्यात येणार आहेत. विविध खेळ, शर्यती व द्वंद्वे या विभागात बदक-बगळा, सापसुरळी, विषामृत, रस्सीखेच वर्तुळातील विद्यार्थी बाद करणे, निशाण पळवणे, फिरत्या दोरीवरून उड्या मारणे यांसह शर्यतींच्या विविध प्रकारांची माहिती देण्यात आली आहे.

स्पर्शाची जाण व स्वरंक्षण या विभागात स्पर्शाची ओळख आणि स्वसंरक्षण कसे करायचे याविषयी माहिती देण्यात आली आहे. योगाभ्यास या विभागात योगाची आठ अंगांची माहिती देवून विविध योगासने कशी करायची त्याचे फायदे काय याविषयी माहिती देण्यात आली आहे. निरामयता या विभागात आहार, व्यायाम,योग विश्रांती व झोप वाईट सवयींना प्रतिबंध,सामाजिकता, वैयक्तिक स्वच्छता आदींविषयी माहिती देण्यात आली आहे. क्रीडांगणविषयक या विभागात खेळासाठी आवश्यक पोशाख, क्रीडा साहित्य, क्रीडांगणावरील सुरक्षितता, प्रथमोपचार याविषयी माहिती देण्यात आली आहे. स्वयंमुल्यमापन या विभागात व्यायाम, आहार आणि सवयीसंदर्भात एक टास्क विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून त्याचे स्वयंमूल्यमापन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. परिशिष्टे या विभागात विशेष गरजा असलेल्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एकंदरीतच या पूस्तकातून विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मस्तिष्क यांचा विकास होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT