

पुणे: 'डिजिटल आणि एआयच्या युगात लेखापरीक्षणाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे लेखापरीक्षण प्रक्रियेतील गुणवत्ता आणि दर्जा टिकवण्यासाठी राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण आणि भारतीय सनदी लेखाकार संस्थान (आयसीएआय) यांनी परस्परपूरक काम केले पाहिजे,' असे मत राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाचे (एनएफ आरआय) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केले.
'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) व राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण यांच्या पुढाकाराने 'आयसीएआय'च्या 'सेंटर फॉर ऑडिट अँड क्वालिटी कमिटी आणि आयसीएआय, पुणे शाखेच्या संयुक्त सहकार्याने आयोजित 'क्रिएटिंग अ बेटर फिनान्शियल रिपोर्टिंग इकोसिस्टीम' या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी गुप्ता बोलत होते.
यावेळी 'आयसीएआय'चे अध्यक्ष सीए प्रसन्नकुमार डी., उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे यांच्यासह 'एनएफआरआय'चे कार्यकारी संचालक श्याम टोंक व अरुण कुमार, 'सेंटर फॉर ऑडिट क्वालिटी कमिटी'चे उपाध्यक्ष सीए प्रमोद जैन आदी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, 'गुंतवणूक दारांचा विश्वास टिकवण्यासाठी दर्जेदार ऑडिट अत्यावश्यक असून, बाह्य लेखापरीक्षक हे सार्वजनिक हिताचे रक्षक आहेत.
लेखापरीक्षकांनी योग्यवेळी त्रुटी निदर्शनास आणल्या, तर गुंतवणूकदारांना संभाव्य जोखमींची पूर्वकल्पना मिळते, असे देखील गुप्ता यांनी स्पष्ट केले. सीए प्रसन्नकुमार डी म्हणाले, "सनदी लेखापालांच्या व्यावसायिक गुणवत्तेला अधिक बळकटी देण्यासाठी सातत्याने कौशल्यविकास आवश्यक आहे. जनतेचा विश्वास टिकवणे हीच व्यवसायाची खरी ताकद आहे. सीए अभिषेक धामणे यांनी सूत्रसंचालन केले. सीए मंगेश किनारे यांनी आभार मानले.