Balbharati Class 4 Book Pudhari
पुणे

Balbharati Class 4 Book: बालभारतीचे नवीन चौथीचे पुस्तक ‘आपल्या सभोवतालचे जग’ प्रकाशित; विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर

१३ प्रकरणांतून पर्यावरण, विज्ञान, समाज व निसर्गाची ओळख; मात्र धड्यांचे गट न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता तज्ज्ञांची

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: विद्यार्थ्यांना पर्यावरण, विज्ञान, समाज, निसर्ग आणि दैनंदिन जीवनातील विविध घटकांची ओळख करून द्यायची आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायचा या प्रमुख उद्देशाने इयत्ता चौथीच्या 'आपल्या सभोवतालचे जग- भाग एक' या पुस्तकाची निर्मिती बालभारतीने केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांची भेट देण्यात आली आहे. चौथीच्या आपल्या सभोवतालचे जग- भाग एक या पुस्तकात १३ प्रकरणांचा समावेश आहे.

'आपल्या सभोवतालचे जग- भाग १' या पुस्तकात अनुभव, निरीक्षण आणि कृतिआधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पुस्तकात रंगीत चित्रे, उपक्रम, प्रयोग, चर्चा आणि प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित उदाहरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. पाठ्यपुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपासच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवते. पर्यावरण, आरोग्य, पाणी, वनस्पती, प्राणी, समाज आणि विविध व्यवसायांची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे. उपक्रम, चित्रे आणि प्रत्यक्ष कृतींच्या अनुभवातून शिकण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

पुस्तकाची सुरुवातच 'ठेवा निसर्गाचा' या पाठाने झाली आहे. या पाठात पाण्याच्या निर्मितीपासून पाणी बचतीपर्यंतची सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. आपले शरीर या पाठाच्या माध्यमातून शरीराची ओळख आणि कार्य कळणार आहे. तर, ग्रह व तारे या पाठातून सूर्यमालेतील ग्रहांची ओळख होणार आहे. आपले हरित सहचर या पाठातून वनस्पती, पालेभाज्या, कडधान्य, तांदूळ, पक्ष्यांचा निवारा आदींविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. गंमत ऋतू बदलांची या पाठातून पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूंची माहिती देऊन संबंधित ऋतूंमध्ये घ्यायचा आहार आणि पोषाख याविषयी माहिती देण्यात आली आहे.

अन्न व निवारा या पाठात मानव आणि पशू-पक्ष्यांना खायला काय लागते आणि त्यांचे राहणीमान कसे असते, याची माहिती दिली आहे. जागरूकता हीच सुरक्षा पाठात नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे आणि त्यापासून सावध राहण्याचे उपाय याविषयी माहिती दिली आहे. स्वच्छ माझा परिसरमधून पर्यावरणाविषयी माहिती देण्यात आली. चला शिकू या नकाशा या पाठातून देशाचा नकाशा, रस्ते, लोहमार्ग यांसह महत्त्वाच्या ठिकाणांची, तर माझा महाराष्ट्र या पाठात महाराष्ट्राची भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती आहे.

जनजीवन, वाहतूक व संदेशवहन या पाठात पूर्वीची पद्धत आणि त्यात काळानुरूप झालेल्या बदलांची माहिती आहे. ऊर्जेशी मैत्री या पाठात ऊर्जेच्या विविध स्त्रोतांविषयी माहिती देत सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून दिले आहे.

पाठांचे पर्यावरण, विज्ञान, समाज, निसर्ग असे गट करणे गरजेचे

पाठ्यपुस्तकात १३ धडे सलग आहेत. त्याऐवजी पर्यावरण, विज्ञान, समाजिक, निसर्ग असे गट करून तीन ते चार प्रकरणे एका गटांत अशी विभागणी अपेक्षित होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या प्रकारे या पाठ्यपुस्तकातून शिकवता आले असते. आता काही प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT