मंचर: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील पाणीपुरवठा योजनेचा सावळा गोंधळ अद्याप कायम असून ग््राामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे गावाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. वारंवार पाईपलाईनला लिकेज होत असल्याने नळ पाणीपुरवठा विस्कळीत होत असून महिलांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे.
मागील तीन दिवसांपासून पाईपलाईनला लिकेज झाल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद होता. चार दिवसांनंतर नळाला पाणी आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ग््राामपंचायतीने दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत नियमित पाणीपुरवठा करावा, अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.
अवसरी खुर्द हे आंबेगाव तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक आहे. गावात शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने राज्यभरातून विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात. त्यामुळे गावाला दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र गेल्या सुमारे 15 वर्षांपासून ग््राामपंचायतीकडून दिवसाआड आणि तेही केवळ अर्धा ते पाऊण तास पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. मोरदरा पाझर तलाव ते गावठाण या सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून लोखंडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाईपलाईन वारंवार गंजून लिकेज होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. चार दिवसांपूर्वी पाईपलाईन लिकेज झाल्यानंतर दुरुस्तीसाठी तीन दिवस लागले आणि त्यानंतरच पाणी सोडण्यात आले.
दीड हजारांची आर्थिक मदत मिळाली नाही तरी चालेल...
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांना रोजची कामे सोडून पाण्यासाठी घरी थांबावे लागत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याकडे लक्ष घालून ग््राामपंचायत प्रशासनाला दररोज नियमित पाणीपुरवठ्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी महिलांनी केली आहे. ’दीड हजारांची आर्थिक मदत मिळाली नाही तरी चालेल, मात्र गावठाणात दररोज पाणी मिळावे,’ अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
उच्च क्षमतेची नवीन मोटर बसविणार
दरम्यान, ग््राामविकास अधिकारी जगन्नाथ शिदोरे यांनी सांगितले की, मोरदरा पाझर तलाव ते पाण्याची टाकी या दरम्यान ओढ्याजवळील लोखंडी पाईपलाईन गंजल्याने लिकेज झाले होते. कामगार उपलब्ध नसल्याने दुरुस्तीस विलंब झाला. तसेच पूर्वी विहिरीवर साडेसात हॉर्सपॉवरची मोटर असल्याने टाकी भरण्यास जास्त वेळ लागत होता. आता 15 हॉर्सपॉवरची नवीन मोटर बसविण्यात येणार असून वेळेत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.