

बारामती: बारामती तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अद्याप मुहूर्त न लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे. वारंवार निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने इच्छुक उमेदवारांचा उत्साह मावळत असून, त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
निवडणुकांच्या अपेक्षेने अनेक इच्छुकांनी तयारीला वेग दिला होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क दौरे, विविध माध्यमांतून प्रचार, देवदर्शन आदी नियोजन करण्यात आले होते; मात्र निवडणुकांची तारीख सतत पुढे जात असल्याने या सर्व तयारीवर पाणी फिरत असल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. विविध राजकीय पक्षांनी आपापल्या पातळीवर उमेदवार निश्चित करून रणनिती आखली असली, तरी निवडणुकांच्या अनिश्चिततेमुळे सगळेच थांबून राहिले आहेत.
सुरुवातीला जानेवारी महिन्यात निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात होता; मात्र तो जवळपास चुकीचा ठरला आहे. प्रशासकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक गेलेली नाही, तेथे फेबुवारी महिन्यात निवडणुकांची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथील निवडणुका एप्रिल महिन्यातच होतील, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर पंचायती व नगर परिषदांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून, महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी साधारण महिनाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे 31 जानेवारीपूर्वी या निवडणुका होणे अशक्य असल्याचे प्रशासकीय पातळीवर स्पष्ट होत आहे.
दरम्यान, ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे निवडणुकांची घोषणा 10 ते 15 जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, त्यावर देखील अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ज्या ठिकाणी आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक आहे, तेथील निवडणुका सध्या होणार नाहीत, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या संदर्भात 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यानंतरच निवडणूक आयोगाची पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे. एकूणच, परीक्षा कालावधी, आरक्षणाचा कायदेशीर पेच आणि प्रशासकीय प्रक्रिया लक्षात घेता, बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एप्रिल महिन्यातच होतील, असा कयास सध्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
परीक्षा कालावधीत शक्यतो निवडणुका नाहीत
याशिवाय फेबुवारी व मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असतात. या काळात निवडणुका टाळल्या जात असल्याने मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होतील, असा अंदाज प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.