

पुणे: वादग््रास्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या बाणेरमधील बंगल्यात मध्यरात्री दरोडा घालण्यात आला. खेडकर यांच्या घरात दहा दिवसांपूर्वी कामाला आलेला नेपाळी स्वयंपाकी आणि साथीदारांनी बंगल्यात जबरी चोरी केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
खेडकरच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले. मध्यरात्री एकच्या सुमारास खेडकर बंगल्यात आली. तेव्हा बेशुद्धावस्थेतील आई-वडिलांना तिने पाहिले. नेपाळी कामगाराने खेडकरचे हात पाय चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर कामगार आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दागिन्यांची लूट करून पसार झाले. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेल्या नेपाळी कामगार आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पूजा खेडकर, त्यांचे वडील दिलीप आणि आई मनोरमा हे बाणेर रस्त्यावरील नॅशनल सोसायटी परिसरातील बंगल्यात राहायला आहेत. खेडकर यांच्या बंगल्यात दहा दिवसांपूर्वी एक नेपाळी कामगार स्वयंपाकी म्हणून कामाला आला होता. खेडकर यांच्या बंगल्यात एक सुरक्षारक्षक आणि नोकर कामाला आहे. शनिवारी (10 जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास पूजा बंगल्यात आल्या. सुरक्षारक्षकाने बंगल्याचा दरवाजा उघडला. मोटार लावून त्या बंगल्यात गेल्या. तेव्हा आई मनोरमा आणि वडील दिलीप हे झोपले होते. गाढ झोपले असल्याने पूजाने त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते झोपेतून जागे झाले नाही. तेवढ्यात तीन ते चार जणांनी पूजाचे हातपाय चिकटपट्टीने बांधले.
एका खोलीत पूजाला बंद करण्यात आले. नेपाळी कामगार आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने, तसेच मौल्यवान चीजवस्तू काढून घेतल्या. त्यानंतर नेपाळी कामगार आणि साथीदार बंगल्यातून पसार झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास चिकटपट्टीने बांधलेले हातपाय पूजाने सोडविले आणि तिने आई-वडील, नोकराला जागे करण्याचा प्रयत्न केला. पूजाने चतु:शृंगी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी आई-वडील, तसेच नोकराला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. बेशुद्धावस्थेतील तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नेपाळी कामगार, साथीदारांचा शोध सुरू
पसार झालेला नेपाळी कामगार, साथीदारांचा शोध घेण्यात आला. त्याने जेवणात गुंगीचे औषध मिसळून खेडकर यांना बेशुद्ध केल्याची शक्यता आहे. खेडकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आई-वडील शुद्धीवर आल्यानंतर जबाब नोंदवू, असे पूजाने पोलिसांना सांगितले आहे. पूजा खेडकरने बनावट प्रमाणपत्र सादर करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. न्यायालायने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. खेडकर हिला बडतर्फ करण्यात आले, तसेच भविष्यातील सर्व परीक्षांसाठी लोकसेवा आयोगाने बंदी घातल होती. खेडकरने सर्व आरोप फेटाळून लावले होते.