बाणेर : महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ औंध-बोपोडीमध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी एकच जागा असून, दोन तुल्यबळ व्यक्ती भाजपकडून इच्छुक होते. त्यात चंद्रशेखर निम्हण यांना भाजपने उमेदवारी दिली व येथील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे यांची उमेदवारी नाकारण्यात आली. महिला गटातील भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांची उमेदवारी नाकारण्यात आली, त्या ठिकाणी भाजपने नवा चेहरा भक्ती गायकवाड यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे भाजपच्या दोन्ही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. यामुळे ही लढत रंगतदार होणार असल्याची चिन्हे प्रभागात दिसू लागली होती. राष्ट्रवादीचे उमेदवारही तोडीस तोड असल्याने दोन राष्ट्रवादी व दोन भाजप, असे चित्र प्रभागात होते. परंतु, येथील सर्व स्तरांतील नागरिकांनी भाजपला पसंती दिल्याने प्रभागातील चारही जागा भाजपने मोठ्या फरकाने जिंकल्या.
या प्रभागात माजी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण, माजी दिवंगत मंत्री चंद्रकांत छाजेड यांची सून सपना छाजेड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या घरातील भक्ती गायकवाड व माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांचे पती परशुराम वाडेकर, असे सर्व पद्धतीने सामाजिक जाण, राजकीय वारसा लाभलेले उमेदवार या प्रभागात भाजपने दिले होते. यामध्ये चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण यांनी आधीही या भागाचे नगरसेवकपद भूषविले होते. त्यांचा व त्यांच्या वडिलांचा जनसंपर्क, त्याचबरोबर चंद्रकांत छाजेड व माजी नगरसेवक आनंद छाजेड यांचा या भागातील जनसंपर्क व भाजप आरपीआय गटातील परशुराम वाडेकर यांचा प्रभागाच्या वस्तीतील जनसंपर्क महत्त्वाचा ठरला असून, या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपचा गड राखण्यात येथील चारही उमेदवार यशस्वी झाले आहेत.
माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या घरातील भक्ती गायकवाड यांनाही गायकवाड यांच्या जनसंपर्काचा फायदा होऊन बोपोडीबरोबरच औंधमध्येही भाजपने चांगली मते मिळवत सर्व उमेदवार आठ हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आणले आहेत. राष्ट्रवादीतून निवडणूक लढलेले प्रकाश ढोरे, विनोद रणपिसे, अर्चना मुसळे, पोर्णमाि रानवडे यांना मतदारांनी नाकारले असून, यामध्ये प्रकाश ढोरे यांनी सुरुवातीला चांगली लढत देत त्यांच्या भागातून आघाडी घेतली होती. परंतु, नंतरच्या फेऱ्यांमध्ये चंद्रशेखर निम्हण यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळविला.
प्रभागात वस्त्यांचा भाग 60 ते 70 टक्के असल्याने या प्रभागात राष्ट्रवादी विजयी होईल, असे गणित मांडले जात होते. बोपोडी भागातील प्रकाश ढोरे यांचा जनसंपर्क व औंध भागातील अर्चना मुसळे व पौर्णमाि रानवडे यांच्या जनसंपर्कामुळे राष्ट्रवादी किमान दोन जागा जिंकेल, असे वाटले होते. परंतु, विद्यमानांना प्रभागातील नागरिकांनी नाराजी दाखवत भाजपने नव्याने दिलेले उमेदवार निवडून दिले आहेत. एकप्रकारे या प्रभागात भाजपची सुप्त लाट पाहावयास मिळाली. मतदान टक्केवारी कमी होऊन देखील भाजप या ठिकाणी निवडून आल्याने एकेकाळी काँग््रेासचा बालेकिल्ला असलेला हा प्रभाग आता भाजपचा झाल्याचे लक्षात येत आहे.