

पुणे: टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने भारतात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात अधिकृत प्रवेश करत ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला सादर केली आहे. टोयोटाच्या गेल्या ३० वर्षांच्या जागतिक इलेक्ट्रिफाईड वाहन अनुभवावर आधारित ही गाडी आहे. शहरातील वापर लक्षात घेऊन तयार केलेली ही एसयूव्ही दिसायला आकर्षक, आतून प्रशस्त आणि चालवताना शांत व दमदार आहे.
एबेला ही गाडी ४९ केडब्ल्यूएच आणि ६१ केडब्ल्यूएच अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ६१ केडब्ल्यूएच बॅटरीसह एका चार्जवर ५४३ किलोमीटरपर्यंत (एआरएआय प्रमाणित) अंतर कापता येते. २० जानेवारीपासून बुकिंग सुरू झाली असून किंमत लवकरच जाहीर केली जाणार आहे. आधुनिक ‘अर्बन टेक’ रचनेमुळे गाडीला भक्कम एसयूव्ही स्वरूप मिळाले आहे.
गाडीच्या आत ड्युअल-टोन सजावट, मोठी पॅनोरामिक रूफ, व्हेंटिलेटेड आसनव्यवस्था, १२ रंगांची लाईटिंग, जेबीएल साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड सुविधा देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी लेव्हल-२ अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्ट प्रणाली, ७ एअरबॅग्स आणि ३६० डिग्री लक्ष ठेवणारा कॅमेरा उपलब्ध आहे.
ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी ८ वर्षांची बॅटरी वॉरंटी, बॅटरी सर्व्हिस, निश्चित बाय-बॅक योजना या सर्व सुविधा देशभरातील ५०० हून अधिक इलेक्ट्रिक वाहन सेवा केंद्रांद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. टोयोटाच्या मल्टी-पाथवे व्हिजनचा हा महत्त्वाचा टप्पा असून, हरित वाहतूक, ऊर्जा सुरक्षितता आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या उद्दिष्टांना या गाडीमुळे बळ मिळणार आहे.