

शंकर कवडे
पुणे : युती, आघाडीसह उमेदवार जाहीर करण्यास झालेला विलंब, एकाच भागातून आलेले सर्वाधिक उमेदवार, मागच्या निवडणुकांच्या तुलनेत तब्बल नऊ हजारांनी घटलेले मतदान या सर्वांचा परिणाम प्रभाग क्र. 12 च्या निकालामध्ये दिसून आला. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात महापालिकेसाठी भाजपलाच चांगलेच झुंजावे लागल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान दिसून आले.
भाजप वगळता अन्य पक्षांनी एकाच भागातील उमेदवार दिल्याने त्याचा परिणाम मतविभागणीवर झाला. पाचव्या फेरीपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत सहाव्या फेरीत भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत निर्विवाद वर्चस्व मिळवित प्रभागात कमळ फुलविले. छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी प्रभागात उमेदवारी जाहीर होण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या पूजा जागडे यांनी दिवाळी संरजामवाटप, शिवनेरी सहल, महिलांसाठी लकी ड्रॉ आदी स्पर्धा घेत मतदारांपर्यंत पोहचविण्याचा सपाटा लावला. यावेळी, अन्य उमेदवारांचीही उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्याही छुपा प्रचार सुरू होता. आरक्षण निश्चित झाल्यानंतर माजी नगरसेविका नीलिमा खाडे यांच्या जागी त्यांचा मुलगा अपूर्व खाडे यांचा उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला, तर माजी नगरसेविका जोत्स्ना एकबोटे यांच्याऐवजी त्यांची कन्या निवेदिता एकबोटे यांना तिकीट पूर्वीपासूनच निश्चित मानले जाते. मागील निवडणुकीत कामगार पुतळा येथून स्वाती लोखंडे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, पक्षांतर्गत नाराजी आणि वसाहतीचे स्थलांतर झाल्याने अनुसूचित जाती गटातून उमेदवाराचा शोध सुरू झाला. यावेळी, सर्वाधिक मतदार असलेल्या वडारवाडी भागातून अनुसूचित जाती गटातून अमृता म्हेत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. युती आणि आघाडीची शक्यता असतानाही हा भाजपच्या वाट्याला जाणार असे चित्र होते. कारण, राष्ट्रवादी काँग््रेासच प्रभागातील तुल्यबळ प्रतिस्पर्धी होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवसाअगोदर कोणतीच स्पष्टता नसल्याने येथील चित्र अंधातरीच होते. अखेर, राष्ट्रवादी काँग््रेासने एकत्र येत निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अटीतटीची लढत होणार हे स्पष्ट झाले. मात्र, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या आघाडी तसेच युती होण्याबाबतच्या निर्णयास विलंब झाल्याने भाजप वगळता अन्य पक्षांना उमेदवार मिळविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याने या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ मिळाला. प्रभागात चारही वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार देऊन भाजपने एकसंधता ठेवली. मात्र, ते उर्वरित पक्षांना साधता आले नाही.
प्रभागाचे भवितव्य ठरविणारा भाग हा वडारवाडी असल्याने बहुतांश पक्षांनी याठिकाणी लक्ष केंद्रित केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही वेळापूर्वी एकत्र आलेली राष्ट्रवादी तसेच शेवटच्या क्षणी नियोजन करणे अवघड झाल्याने राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने गावठाण भागातील बाळासाहेब बोडके यांना, तर वडारवाडी मधील नीता मंजाळकर, दयानंद इरकल आणि नीता अलगुडे यांना उमेदवारी दिली. याखेरीज, काँग््रेास पक्षाने गोखलेनगर भागातून राजश्री अडसूळ, तर ऋषीकेश जाधव, प्रियंका पवार आणि जावेद निलगर या वडारवाडीतील तिघांना उमेदवारी दिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शिवाजीनगर भागातून सायली पवार, तर वडारवाडी भागातून विशाल पवार, मंगल पवार आणि विशाल डोंगरे यांना उभे केले. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या प्रवर्गात मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली. याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. प्रभागातील विविध भागांत राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष क्रमाक्रमाने थोड्या फार मताने पुढे होते. अखेरच्या टप्प्यात सिंबायोसिस, शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील मतमोजणी सुरू झाल्याने बहुतांश मते भाजपच्या पारड्यात गेल्याने सहाव्या फेरीत विजय निश्चित झाला. दरम्यान, प्रभाग क्र. 7 असलेल्या वाकडेवाडी-गोखलेनगर प्रभागात राष्ट्रवादीचे तीन आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याने त्यानंतर असलेल्या प्रभाग क्र. 12 च्या मतमोजणीवेळी निकाल काय लागेल याची चिंता उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती. पाचव्या फेरीपर्यंत हेच चित्र कायम राहिले. सहाव्या फेरीअखेर विजयी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तीन उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडत बाहेर येत जल्लोष केला.