

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये चीनच्या ली निंग स्टार संघाच्या ल्युक मुडग्वेने सर्वोत्तम गुण मिळवले. अर्थात, दुसऱ्या टप्प्यात तो अव्वल राहिला. त्याने 2 तास 31 मिनिटे 49 सेकंद वेळ नोंदवली आणि पुन्हा एकदा त्याने बाजी मारली. यासह त्याने यलो जर्सीवरील आपली पकड आणखी घट्ट केली.
पुणे जिल्ह्यातील 105.3 किलोमीटर अंतरावर पसरलेल्या ‘मराठा हेरिटेज सर्किट’ने ही शर्यत किल्ले, तीव चढण आणि तितक्याच धोकादायक उतारांच्या लँडस्केपमध्ये नेली. या कसोटीत ल्यूक खरा उतरला. त्याने पहिल्या टप्प्यातही बाजी मारली होती. सलग दुसऱ्यांदा त्याने यलो जर्सीचा मान मिळवला. या सलग दोन विजयांमुळे, महाराष्ट्रच्या खडतर भूप्रदेशात शर्यत पुढे जात असताना त्याने आघाडी कायम राखली आहे. अर्थात, ल्यूकसाठी हा विजय सोपा नव्हता. थायलंडच्या रुजाई इन्शुरन्स विनस्पीड संघाच्या ॲलन कार्टर बीटल्सने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली, तर बेल्जियमच्या टार्टेलेटो-इसोरेक्स संघाच्या योर्बेन लॉरिसेनने तिसरे स्थान पटकावले. लॉरिसेनचे हे सलग दुसरे पोडियम फिनिश ठरले.
नियमानुसार अव्वल क्रमांक मिळवल्याने ल्यूकला 10 सेकंदांचा बोनस, बीटल्सला 6 सेकंद आणि लॉरिसेनला 4 सेकंदांचा बोनस देण्यात आला. ही लढत इतकी तीव होती की, पहिल्या सहा सायकलपटूंनी 2 तास 31 मिनिटे 49 सेकंद अशा एकाच वेळेत शर्यत पूर्ण केली. स्पेनच्या बर्गोस बुरपेलेट बीएच संघाचे क्लेमेंट एलोनो आणि जंबालजम्ट्स सेनबायर यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले, तर गुआमच्या युरोसायकलिंगट्रिप्स - सीसीएन संघाचा स्टीफन बेनेटोन सहाव्या स्थानी राहिला. ‘फोटो फिनिश’च्या आधारे ही क्रमवारी निश्चित करण्यात आली.
आज दमछाक करणारा रस्ता होता. यात अनेक चढ-उतार होते. मी शेवटपर्यंत तग धरला आणि एका लहान गटातून स्प्रिंट करण्यात यशस्वी झालो. हीच माझी जमेची बाजू आहे आणि आज पुन्हा एकदा मी त्याची अंमलबजावणी करू शकलो, याचा आनंद आहे. अंतिम टप्प्यात वेग वाढविण्याचा प्रयत्न केला खरा; पण सर्वच स्पर्धक ताकदीचे आहेत.
ल्यूक मुडग्वे, ली निंग स्टार संघाचा सायकलपटू