पुणे: औंध येथे नागपूरच्या धर्तीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानंतर त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा केला.
औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेत ‘एम्स’च्या स्थापनेमुळे वैद्यकीय शिक्षणासह पुण्यात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी सुविधाही उपलब्ध करून देण्याचे स्वप्न दादांनी पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भावना आता व्यक्त होत आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयावर दिवसेंदिवस रुग्णसेवेचा भार वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. औंधला एम्स सुरू झाल्यावर रुग्णसेवेचा एकाच शासकीय रुग्णालयावर येणारा भारही हलका होणार आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यसेवेसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील, असे अजित पवार यांनी नमूद केले होते.
नागपूरमधील एम्सच्या धर्तीवर औंध जिल्हा रुग्णालय परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहावे, असा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा मानस होता. त्याबाबत त्यांनी बैठकही घेतला. ते विविध विकासकामांसाठी औंध जिल्हा रुग्णालयात अनेकदा आले. पूर्ण जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधे कमी पडू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय
अजित पवार यांच्याशी ससून रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत फोनवर बरेचदा बोलणे व्हायचे. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हाच त्यांचा आग््राह होता. त्यांच्या ओळखीने कोणताही रुग्ण ससूनमध्ये आला तर त्याला नियमानुसार मदत करा, असे सांगायचे. रुग्णांसाठी फोन करायचे, काळजी घ्यायला सांगायचे.डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय