पुणे

पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री

मोनिका क्षीरसागर

पुणे : पुढारी वृत्तसेवा ; पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंहगड ई-बस सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस संचलन मैदान येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमानंतर हा शुभारंभ कार्यक्रम झाला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एसटी महामंडळाच्या संप काळात पीएमपीएमएलच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्यात आली. पीएमपीएमएलच्या ई-बस सेवेमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून, शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहीत सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्याहस्ते वाघोली येथील चौथ्या ई-बस आगाराचे तसेच 'माझा सिंहगड माझा अभिमान' योजनेअंतर्गत ई-बस सेवेला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. ई-बसच्या प्रातिनिधिक स्वरूपात किल्ल्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय  संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT