पुणे; पुढारी वृत्तसेवा : संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात नेहमीप्रमाणे आयटी दिंडीतील वारकर्यांचाही उत्साह आणि जोश पाहायला मिळाला. 'ज्ञानोबा माउली तुकाराम…' असा गजर करीत पालखीत सहभागी झालेल्या आयटीयन्ससह विविध क्षेत्रांत काम करणारे नोकरदार आणि व्यावसायिकांची ऊर्जा पाहण्यासारखी होती. कामाच्या व्यापातून वेळ काढत त्यांनी आळंदी ते पुणे असा प्रवास केला आणि यंदा आयटी दिंडीत तरुणाईचे नव्हे, तर ज्येष्ठांचाही सहभाग असल्याचे दिसले. प्रत्येकाने 'धर्म विठोबा, कर्म शिवबा' असा संदेश दिला.
पालखी सोहळ्यात दर वर्षीप्रमाणे यंदाही आयटी दिंडीतील 2 हजार आयटीयन्ससह आणि विविध क्षेत्रांतील लोक सहभागी झाले. पालखीच्या भक्तिरंगात तेही रंगून गेले. यंदा काही जणांनी आळंदी ते पुणे असा पायी प्रवास केला. तर, काही जण पंढरपूरपर्यंत पायी वारी करणार आहेत. तेही पुढील मार्गावर मार्गस्थ झाले. पहाटे आयटी दिंडीतील वारकर्यांनी आळंदीहून पुण्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि दुपारी तीनच्या सुमारास ते पुण्यात पोचले.
कविता काकडे, अभय कुलकर्णी, योगेश गोठे, अमरेंद्र जोशी, मानसी जोशी हेही आळंदी ते पुणे असा पायी प्रवास आयटी दिंडीसोबत करीत आले. त्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करीत सोहळ्यात चालल्याने वेगळीच ऊर्जा संचारत असल्याचे सांगितले.
आयटी दिंडीत सहभागी झालेल्या 63 वर्षीय दमयंती आंबेकर म्हणाल्या, 'तरुण बनूनच तरुणांसोबत चालले. खूप आनंद वाटला. पालखीत सहभागी होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. अनेक आयटी क्षेत्रांतील तरुण पालखीत सहभागी झाले. एक वेगळीच अनुभूती मिळाली. हा सोहळा खूप अद्वितीय आहे.'
हेही वाचा