भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी प्रमुख, जनता दलाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पीएमटीचे माजी अध्यक्ष, दिवंगत काँग्रेस नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आणि सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय व पुणे महापालिकेच्या निवडणुकांचा चालताबोलता विकीपीडिया अशी अनिल सोंडकर यांची ओळख. दिग्गजांच्या सहवासात असूनही महापालिका निवडणुकीत अनेकदा त्यांना डावलले गेले. आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात अनेक निवडणुका त्यांनी अनुभवल्या. त्यांची माहिती त्यांच्याच शब्दांत...
अनिल सोंडकर
मुंबईत 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी पुण्यात सुभाष सर्वगौड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शाखा सुरू झाली. माजी नगरसेवक अजय भोसले यांचे वडील जयंत भोसले हे या शाखेचे प्रमुख होते. दिवंगत शिवसेना नेते नंदू घाटे, काका वडके, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांचे वडील लक्ष्मण बधे आदी मंडळी 1972-73 मध्ये शिवसेनेत आले. त्या वेळी मी एस. पी. कॉलेजला शिकत होतो आणि विद्यार्थ्यांचे नेतृत्व करीत होतो. माझी भाषणे व धडाडी पाहून बाळासाहेबांनी मला भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख केले होते. मुंबईतील लालबाग-परळ भागावर वर्चस्व असलेले गिरणी कामगारांचे धडाडीचे कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाईंची 1970 मध्ये राजकीय वर्चस्वातून हत्या झाली.
त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक निवडून आले. एका हत्या प्रकरणात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दिलीप हाटे यांच्या भेटीसाठी बाळासाहेब पुण्यात आले होते. त्याचवेळी सीमावादावरून पुण्यात उसळलेल्या दंगलीत शिक्षा झालेल्या शिवसैनिकांची मात्र त्यांनी भेटही घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेचे पुण्यातील कार्यकर्ते नाराज झाले. तुरुंगात असलेले हे कार्यकर्ते पॅरोलवर सुटून आल्यानंतर पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी सेना सोडायचा निर्णय घेतला. सुभाष सर्वगौड, बाबूराव रजपूत, डॉ. शंकरराव तोडकर यांच्यासह माझ्यासारखे काही कार्यकर्ते सेनेला रामराम करून जनता पार्टीत सामील झालो.
जनता पार्टीचे काम करीत असताना 1981 मध्ये पीएमटीच्या रिक्त झालेल्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. त्या वेळी काँग्रेसने अजित आपटे व विजय नालम यांना उमेदवारी दिली. भाजपकडून ताज अहमद सगीर खान यांना, तर जनता पक्षाकडून मला तिकीट देण्यात आले. त्यामुळे चारही जागा बिनविरोध होणार, असे चित्र दिसत असतानाच नगरसेवक नंदू घाटे यांनीही अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक अटळ होती. महापालिकेत त्या वेळी 85 नगरसेवक होते. ज्या जनता पक्षातर्फे मी उभा होतो तो पक्ष अल्पमतात होता. आमचे फक्त 27 नगरसेवक होते. तरीही सर्वाधिक म्हणजे 85 पैकी 72 मते मिळवून मी विजयी झालो. विद्यमान नगरसेवक असलेल्या नंदू घाटे यांचा या वेळी पराभव झाला. या निवडणुकीत संभाजीराव काकडे, कुसाळकर शेठ, शिवाजीराव भोसले, उल्हास काळोखे यांनी मला पाठिंबा दिला होता.
पीएमटीवर विजयी झाल्यावर काळोखे यांच्यामार्फत तत्कालीन काँग्रेस नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी मला भेटीसाठी बोलावून घेतले. त्या वेळी पीएमटीचे चेअरमन करणार असाल, तरच अनिलला पाठवतो, असे संभाजीराव काकडे यांनी त्यांना कळविले. त्या वेळी महापालिकेत गाडगीळ-टिळक या दोन गटांतच सत्तेसाठी चुरस होती. अखेर अजित आपटे व मी आम्ही दोघांनीही सहा-सहा महिन्यांसाठी चेअरमनपद घ्यावे, असे ठरले व मी पीएमटीचा चेअरमन झालो.
काँग्रेसची सूत्रे नंतर सुरेश कलमाडींकडे गेली. मी कट्टर गाडगीळ समर्थक असल्याने सुरुवातीची दहा वर्षे त्यांनी मला दूरच ठेवले. दरम्यान, 1992 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट कसबा मतदारसंघातून 25 हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. नंतर 1996 च्या लोकसभा निवडणुकीत कलमाडी यांच्याविरोधात बापट उभे होते. कसबा पेठेतील त्यांचे मताधिक्य कसे कमी करायचे, हा कलमाडींपुढे मुख्य प्रश्न होता. कसबा पेठेत माझे काम होते. कार्यकर्त्यांची फळी होती. कसब्याचे लीड तोडण्याची जबाबदारी त्यांनी माजी महापौर कमल व्यवहारे यांच्यावर सोपविली. व्यवहारेताईंनी माझी भेट घेतली व कलमाडींसाठी काम करण्याची गळ घातली.
पण, माझ्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी कलमाडींपर्यंत पोहचविले. ते समजताच त्यांनी छाजेड व राजा महाजन यांना माझ्या घरी पाठविले. रात्री बाराच्या सुमारास मला ते कलमाडी हाऊसवर घेऊन गेले. एका बंद खोलीत कलमाडी यांनी माझ्याशी चर्चा केली. मी अडचणीत आहे, पूर्वीचे सगळे विसरून तुम्ही मला मदत करा, अशी विनंतीही त्यांनी केली. कलमाडींचे समर्थक कसब्यातील लीडबाबत साशंक असताना 25 हजारांचे लीड मी 7 हजारांवर आणतो, असे आश्वासन मी त्यांना दिले. त्यामुळे कसब्याची सूत्रे व्यवहारे यांच्याकडून काढून माझ्याकडे सुपूर्त केली. शब्द दिल्याप्रमाणे कसब्याचे लीड मी तोडून दाखविले आणि कलमाडी विजयी झाले.
पुढे मला शिक्षण मंडळाच्या चेअरमनपदाची संधी आली. परंतु, ज्यांच्या विजयासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली त्यांनीच ऐनवेळी मला डावलले. काँग्रेसचा निष्ठावंत असूनही तिकिटे कापली. स्वीकृत सदस्यपद देण्याचे आश्वासन देऊन नंतर माझाच फॉर्म बाद ठरविला गेला. जो माणूस इतरांचे विधानसभा, लोकसभेचे फॉर्म भरून देतो, त्याचाच अर्ज कसा काय बाद होऊ शकतो, हेच मला आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)