मंचर : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्याने अनेक शेतजमिनी वाहून गेल्या असून, काही ठिकाणी तर अक्षरशः धबधबे तयार झाले आहेत. या भागातील प्रमुख पीक असलेली भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. (Latest Pune News)
जांभोरी येथील हारकू वसंत केंगले, मेघोलीतील कोंडीबा रामजी पोटे, लक्ष्मण मुक्ता शेंगाळे, शशिकांत मुक्ता शेंगाळे, जितेंद्र महादू शेंगाळे, लक्ष्मण चिमाजी शेंगाळे, मारुती यशवंत शेंगाळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. ’खाचरात सतत पाणी साचत असल्याने पुढील काळात अधिक नुकसान होईल,’ अशी भीती शेतकरी बुधाजी डामसे यांनी व्यक्त केली.
आदिवासी शेतकऱ्यांसाठी भात हेच वर्षभराचे मुख्य पीक असते. त्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. मात्र, अतिवृष्टीमुळे त्यांच्या कष्टाचे पाणी होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. आटळवाडी-बोरघर येथील शेतकरी उल्हास मुकनाजी वाळकोळी यांची जमीन वाहून जाऊन तेथे धबधबा तयार झाला आहे. नुकसानग््रास्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी विकास पोटे यांनी केली.
’संपूर्ण वर्षभर भातशेतीवर मेहनत घेतली. आता पावसामुळे खाचरे वाहून गेली. सगळी मेहनत वाया जातेय. शासनाने मदतीचा हात दिला नाही, तर उपासमारीचे दिवस येतील, असे जांभोरीतील शेतकरी हारकू केंगले यांनी सांगितले.
भातपिकावरच आमचे जीवन अवलंबून आहे. सध्या खाचरांत पाणी साचले असून, पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आम्हाला तातडीने शासकीय मदतीची गरज आहे, असे आटळवाडी-बोरघर येथील शेतकरी उल्हास मुकनाजी वालकोळी यांनी सांगितले.
पावसाने रावडेवाडीतील फ्लॉवर पिकाचे नुकसान
शिरूर तालुक्यातील रावडेवाडी परिसरातील शेतकरी गेल्या आठवडाभरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. परिसरात घेतलेले फ्लॉवर पीक पावसाने पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून, तोडणीस आलेला माल कुजल्याने बाजारात विक्रीसाठी पाठवणे शक्य झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
रावडेवाडीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी फ्लॉवरची लागवड करतात. या हंगामात उत्पादन खर्च जास्त झाला होता, त्यातच बाजारभाव घसरल्याने शेतकरी आधीच अडचणीत होते. मात्र, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. महिन्याभराचा कष्टाचा घाम पावसाने अक्षरशः वाहून नेल्याची खंत शेतकऱ्यांत आहे.
स्थानिक शेतकरी संदेश येवले, आकाश येवले, नवनाथ येवले, गोरख टिकेकर, ओमकार रावडे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, ‘हजारो रुपये खर्च करून आम्ही पीक लावले होते. मात्र आता पीक विक्रीयोग्य राहिलेले नाही. आधीच भाव कोसळले होते, त्यात माल कुजल्याने खर्चही वसूल होणार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुढे काय करावे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.