पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणीच्या कामाला वेग आला असतानाच दिवाळीनंतर बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांत दहा किलो बटाट्याचा दर २५० ते ३०० रुपयांवरून थेट १४० ते १५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव परवडणारा नसल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, पारगाव आदी गावांमध्ये बटाटा काढणीचा हंगाम सुरू आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस काढणीची कामे थांबविण्यात आली होती. दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी पुन्हा काढणीला वेग दिला आहे.
त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बटाटा बाजारात विक्रीसाठी येत असल्याने दरावर परिणाम झाला आहे. दिवाळीपूर्वी बटाट्याला १० किलोला २४० ते २५० रुपये बाजारभाव मिळत होता. काही दिवसांपूर्वी हाच दर ३०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती.
मात्र, दिवाळीनंतर बाजारभावात सातत्याने घसरण सुरू झाली. सध्या दहा किलोला केवळ १४० ते १५० रुपये मिळत आहेत. बियाणे, खते, औषधे, मशागत, पाणी, मजुरी आणि काढणीचा खर्च विचारात घेता हा दर परवडणारा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. थोरांदळे येथील बटाटा उत्पादक शेतकरी श्रीराम बाळू टेमगिरे यांनी सांगितले, की हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील बटाटा सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील बटाटा प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील बाराबंकी, आग्रा, झाशी, तसेच दिल्लीतील आझादपूर मंडईसह विविध बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. मात्र, या बाजारपेठांमध्ये हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील बटाट्याची आवक वाढल्याने पुणे जिल्ह्यातील बटाट्याला अपेक्षित मागणी आणि दर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.