Potato Pudhari
पुणे

Ambegaon Potato Price: आंबेगावच्या बटाट्याला प्रतिक्विंटल ३ हजारांचा भाव; परराज्यांतील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर!

कमी पावसामुळे उत्पादन खर्चात वाढ; उत्तर भारतातील नवीन बटाटा बाजारात येण्यापूर्वी महाराष्ट्रातील मालाला मागणी

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने बटाटा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागला आहे. मशागतीपासून पाणी व्यवस्थापनापर्यंत खर्च वाढल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. मात्र, सध्या बटाट्याला प्रतिक्विंटल ३००० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परराज्यांतील व्यापारी आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन बटाटा खरेदी करत आहेत.

उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पंजाब या प्रमुख बटाटा उत्पादक राज्यांमध्ये नवीन बटाट्याची काढणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बटाट्याला बाजारपेठेत मागणी वाढली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी परराज्यांतील व्यापारी आंबेगाव तालुक्यात खरेदीसाठी दाखल होत आहेत.

त्यामुळे स्थानिक बटाटा उत्पादकांना माल विक्रीसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पावसाअभावी बटाट्याची अपेक्षित फुगवण झालेली नसल्याचे दिसून येत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव समाधानकारक असणे आवश्यक आहे, असे निरगुडसर येथील शेतकरी बाबाजी नथू ढोबळे यांनी सांगितले.

बाजारभाव टिकून राहण्याची अपेक्षा

यंदा कमी पावसामुळे बटाटा पिकासाठी एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या मिळणाऱ्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च भरून निघण्यास मदत होईल. बाजारभाव टिकून राहिल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे, असे थोरांदळे येथील शेतकरी मंगेश टेमगिरे यांनी सांगितले.

दर्जेदार माल बाजारात आणावा

शेतकऱ्यांनी पूर्ण वाढ झालेला आणि चांगल्या प्रतीचा बटाटा काढावा. त्याची योग्य प्रतवारी करून आकारानुसार वर्गीकरण करावे. दर्जेदार माल बाजारात आणल्यास ग्राहकांचा विश्वास वाढण्यासह बाजारभाव टिकून राहण्यास मदत होईल, असे के. एफ. पोटॅटो ट्रेडर्सचे व्यापारी मयूर चिखले यांनी सांगितले.

काढणीसाठी मध्य प्रदेशातील मजूर

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, थोरांदळे, वळती आणि नागापूर परिसरात बटाटा काढणीचा हंगाम सुरू होत असल्याने मध्य प्रदेशातील शेतमजुरांची कुटुंबे दाखल झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही रोजगाराच्या शोधात या मजुरांनी आपल्या कुटुंबांसह आंबेगाव तालुक्याचा रस्ता धरला आहे. बटाटा पाला कापणी आणि काढणीच्या कामांना वेग आला आहे. मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांच्या टोळ्या कुटुंबांसह विविध गावांमध्ये वास्तव्यास दाखल झाल्या आहेत. बटाटा काढणीचा हंगाम हा या मजुरांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT