Potato Crop Pudhari
पुणे

Ambegaon Potato Crop: आंबेगावच्या पूर्व भागात बटाटा पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव

उष्णता वाढली, पावसाने दिली हुलकावणी; फुलोऱ्यातील पिकाला फटका बसण्याची शेतकऱ्यांना चिंता

पुढारी वृत्तसेवा

पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे, गांजवेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बटाटा पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. वातावरणातील वाढती उष्णता आणि पावसाने फिरवलेली पाठ याचा परिणाम बटाटा पिकावर होत आहे. फुलोऱ्यात आलेल्या पिकाला रोगाचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बटाटा पिकावर औषध फवारणी सुरू केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बटाटा पिकाची लागवड करतात. यंदाही रांजणी, वळती, थोरांदळे, नागापूर आणि गांजवेवाडी परिसरात मोठ्या क्षेत्रावर बटाटा लागवड करण्यात आली आहे. सध्या या भागातील बटाटा पीक दीड ते दोन महिन्यांचे झाले आहे. सुरुवातीच्या काळात पिकाला पोषक वातावरण लाभल्याने बटाट्याची वाढ चांगल्या प्रकारे झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या.

सध्या बटाटा पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असून बटाटे तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर पिकाला पाण्याची आणि पोषक वातावरणाची गरज आहे. मात्र वाढती उष्णता व पावसाचा अभाव यामुळे पिकावर ताण निर्माण होत आहे. त्यातच लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढल्याने बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

लाल कोळीच्या प्रादुर्भावामुळे बटाटा पिकाच्या पानांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असताना आता कीड व रोगाच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बटाटा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आगामी काळात वातावरणात बदल होऊन पाऊस झाल्यास पिकाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा बटाटा उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT