

पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत विसर्जन पाचशे-सहाशे मंडळांच्या छोट्या मूर्तींचे झालेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे विसर्जन शहाणपणाचे झाले, विसर्जन विवेकीपणाचे झाले, विसर्जन समाजहिताच्या कळकळीचे झाले.
Pune Ganpati visarjan 2026
सुनील माळी
पुणे : दरवर्षी लांबत जाणारी, पोलिसांपासून ते सर्वसामान्य पुणेकरांच्या सहनशीलतेचा, शारीरिक क्षमतेचा अंत पाहणारी विसर्जन मिरवणूक आटोपशीर वेळेत, आनंद लुटता येईल एवढ्या आवाजाच्या संगीताच्या साथीने व्हावी, यासाठी अनेक वर्षे नानाविध प्रयत्न केले जातात; पण शेवटी मिरवणुकीचा दिवस आला की, या सगळ्या प्रयत्नांनाच बुक्का लावला जातो आणि ती त्रासदायक रूप धारण करते. ही मिरवणूक सर्वांना आनंददायी व्हावी, यासाठी केलेले सर्व प्रयत्न काही कार्यकर्त्यांच्या आगाऊपणाने पाण्यात जातात. त्यामुळे या प्रयत्नांचा काहीच उपयोग नसल्याने मिरवणूक जशी होईल, तशी होऊ द्यावी, 'आपण सर्व उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे', या पद्धतीची नकारात्मक विचारसरणी समाजातील जाणत्यांपासून ते सर्वसामान्य पुणेकरांपर्यंतच्या सर्वांमध्ये येत गेली.
यंदा बापट नामक एक सर्वसामान्य नागरिक उभा राहिला. त्याने कानांची ऐकण्याची नैसर्गिक क्षमता आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त करणाऱ्या कर्णकर्कश्य आवाजाविरोधात आवाज उठवला. दांडग्या कार्यकर्त्यांनी त्याची मुस्कटदाबी केली खरी; पण आतापर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारे सर्वसामान्य पुणेकर त्याच्या त्या धाडसामागे उभे राहू लागले. त्यांची संख्या वाढत गेली. त्याच्या मुलाखतींना लाखोंच्या संख्येने प्रेक्षक म्हणजे व्ह्युअर्स मिळाले. अगणित लाईक्स आल्या. कॉमेंट्समधून राजकीय पाठबळाने टर्रेबाजी करत डीजेचा जुलूम करणाऱ्यांची कडक शब्दांत हजेरी घेतली जाऊ लागली.
जनमत कार्यकर्त्याच्या बाजूने नाही तर एकांड्या शिलेदारामागे असल्याचे लक्षात आल्यावर राजकीय पक्षांनी चलाखी सुरू केली. 'उत्सव पारंपरिक रीतीने होईल, लोकांना त्रास होणार नाही', अशी नागरिकांना म्हणजेच मतदारांना गोंजारण्याची भाषा त्यांनी सुरू केली. राज्यकर्त्यांची समजूतदारपणाची भाषा ऐकून पोलिसांनीही बदलत्या परिस्थितीत "चार टॉप आणि चार बेस एवढ्याच स्पीकरला परवानगी देणार", अशी राणाभीमदेवी घोषणा सुरू केली. मिरवणुकीतील दोन मंडळांत अंतर पडू नये, यासाठी 'धक्का पथके' ठेवणार, असेही त्यांनी घोषित केले. खुद्द उच्च न्यायालयानेही याची दखल घेत "नागपूर, सोलापूरला डीजे बंदी, मग पुण्याला का नाही?" असा सवाल विचारला आणि "मोठ्या आवाजाने बाप्पा पावतो का?" अशी खोचक विचारणाही केली. त्यामुळे यंदा काहीतरी वेगळे घडेल, चांगल्या बदलाची सुरुवात होईल, या आशेला अंकुर फुटला...
प्रत्यक्षात मात्र मंडळांच्या अतिउत्साही, बेलगाम कार्यकर्त्यांना थोपवण्यात, त्यांचा उत्साह संयमी लक्ष्मणरेषेतच ठेवण्यात पोलिस, राज्यकर्ते, स्थानिक नेतृत्व या साऱ्यांना अपयश आले. मिरवणूक तिच्या नेहमीच्याच वळणावर गेली. चतुर्दशीला सकाळी दहाला सुरू झालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशीचा सूर्य मावळण्याच्या बेतात आला तरी संपली नाही.
"आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या वेळेप्रमाणेच पुढे जाणार", अशी कूर्रेबाज भूमिका अनेक मंडळांनी घेतली. स्पीकरच्या भिंतींना मर्यादा घालण्याच्या आदेशाला अनेकांनी कुठल्या कुठे फेकून दिले. स्पीकरचे टॉप किती लावता, ते महत्त्वाचे नसते तर त्याचा आवाज तुम्हाला सुसह्य होतो का असह्य होतो, ते महत्त्वाचे असते. रात्री बारापर्यंत आणि नंतर पहाटे सहानंतर बाजीराव, शिवाजी या रस्त्यांवर स्पीकरसमोर भानावर असलेल्या सामान्य माणसाला उभे राहणे अशक्य वाटत होते. त्याच्या बेसने छातीचे ठोके चुकताहेत की काय, असा प्रश्न पडत होता. त्याबरोबरच प्रखर दिव्यांचे डोळ्यांत घुसणारे झोत वातावरण आणखीनच असह्य करत होते. मंडळांना दोनच पथके मिरवणुकीत आणायला परवानगी देण्यात आल्याचे मोठ्या आवाजात सांगण्यात आले होते; प्रत्यक्षात काही मंडळांनी चार-चार पथके घेऊन मिरवणुकीचा बराच मार्ग आपल्याच पथकांनी खाऊन टाकला. दोन मंडळांमध्ये पडत असलेले भलेमोठे अंतर कमी करण्यातही पोलिस अपयशी ठरले.
'आपण कसेही वागलो, तरी आपले कुणीच वाकडे करू शकणार नाही', ही भावना बळावली आणि त्यातूनच आलेल्या गुर्मीतून मिरवणुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न उधळले गेले. शासनदरबारातूनही कडक भाषेत इशारा देण्याऐवजी 'पारंपरिक पद्धतीनेच उत्सव होईल', अशी गुळमुळीत भाषा वापरण्यात आल्याने पोलिस दलातही संभ्रम निर्माण झाला. पोलिसांनी आणलेले उसने अवसान राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ न मिळाल्याने अखेरच्या दिवशी गळून गेले. "आम्हाला विरोध करतो काय? या बापटाला आता धडाच शिकवतो", या मनोवृत्तीतून मुद्दाम स्पीकरच्या भिंती आणण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
मिरवणुकीतील या विकृतीची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे. पोलिसांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंतच्या सर्वच घटकांना संतप्त टीकेला सामोरे जावे लागू लागले आहे. ही संतप्त लोकभावना शांत करण्यासाठी मंडळांवर गुन्हे नोंदण्याचा फार्स करण्यात येईल. काही महिने उलटून वातावरण शांत झाले, तसेच दुसरा एखादा विषय पुढे आला की हे गुन्हे मागे घेण्याची रीतसर घोषणा होईल. तोपर्यंत वातावरण शांत झाल्याने नागरिक फारसा प्रतिकार करणार नाहीत आणि पुढच्या वर्षी पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' असे होईल.
मुळात पुण्याची लोकसंख्या वाढली, मंडळे वाढली. मुख्य मिरवणुकीत पहिल्या वर्षी तीन गणपती सहभागी झाले, तर दुसऱ्या वर्षी १२०. त्यानंतरच्या आतापर्यंतच्या तब्बल एकशेबत्तीस वर्षांत मंडळे वाढत गेली; पण मुख्य मिरवणुकीचे मार्ग तेवढेच राहिले. मिरवणुकीचे मार्ग वाढवायला हवेत. कर्वे रस्त्याची स्वतंत्र मिरवणूक असताना गोखलेनगर, वडारवाडीचे गणपती बाजीराव रस्त्यावर का येतात? लष्कर भागातील मिरवणूक स्वतंत्र असताना टिळक रस्त्यावर तिथली काही मंडळे का येतात? वास्तविक, लक्ष्मी रस्त्याच्या पूर्वेकडे असलेल्या मंडळांनी मुख्य मिरवणुकीत न येता लष्कर भागातील मिरवणुकीत सहभागी होणेच योग्य ठरणार नाही का? मिरवणुकीवरील मंडळांचा ताण कमी करण्यासाठी नवे मार्ग सुरू करण्याचा विचार करणे योग्य ठरेल. मात्र त्यासाठी लागेल सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाणारे, बोटचेपेपणा न करता त्यांच्या चुका स्पष्टपणाने दाखवून त्यांना योग्य दिशेकडे नेणारे समंजस राजकीय नेतृत्व. अशा नेतृत्वाचा अभाव हेच या प्रश्नाचे मूळ नव्हे काय?