पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आगाप कांदा लागवडीला वेग आला आहे. पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्यापूर्वी पीक घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून लवकर कांदा लागवड आणि काढणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गतवर्षी कांद्याला मिळालेल्या चांगल्या बाजारभावामुळे यंदाही दर समाधानकारक राहतील, अशी आशा उत्पादकांना आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी कांदा लागवडीपूर्वी अनेक शेतकरी आगाप कांद्याची लागवड करतात.
त्यानुसार थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे आणि पारगाव परिसरात लागवडीची कामे सुरू झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रोपे तयार करण्यास सुरुवात केली असून, काही शेतांमध्ये प्रत्यक्ष लागवडीला वेग आला आहे. गतवर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला होता.
त्यामुळे यंदाही कांद्याचे दर चांगले राहतील, अशी अपेक्षा आहे. समाधानकारक बाजारभाव मिळाल्यास उत्पादन खर्च भरून निघेल, या आशेने शेतकरी लागवडीचे नियोजन करत आहेत. मात्र, यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने पाणीटंचाईचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. परतीच्या पावसानेही दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, उभ्या पिकांनाही पाण्याचा ताण जाणवू लागला आहे.
मीना नदीपात्र कोरडे; पाणीटंचाईची चिंता
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मीना नदीपात्र सध्या कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्यास कांदा लागवड आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वळती परिसरातील शेतकरी नंदाराम जाधव यांनीही पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्यापूर्वी आगाप कांदा काढणीला येईल, या अपेक्षेने लागवडीचे नियोजन केल्याचे सांगितले.