आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोंडीची रविवारी (दि. ५) आळंदी शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
यंदा बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे घराण्याला मिळाला आहे. हर्षवर्धन प्रदीप रानवडे यांच्या भीम-अर्जुन व तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांच्या सूर्या-रामा बैलजोडींची रविवारी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये तसेच बँडच्या सुमधुर वाद्यात व टाळ-मृदंगांच्या गजराच्या भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रथम चाकण चौक येथील श्री नृसिंह स्वामी मंदिरासमोर त्यांच्या मानाच्या बैलजोडीचे विधिवत पूजन करण्यात आले. तद्नंतर मिरवणूक प्रदक्षिणामार्गे भैरवनाथ चौक, हजेरी मारुती चौक, चावडी चौक, आळंदी पोलिस ठाणे, पालिका चौक असे मार्गक्रमण करीत माऊली मंदिर महाद्वारासमोर पोहचली.
या वेळी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त रोहिणीताई पवार, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी मानाच्या भीम-अर्जुन व सूर्या-रामा या बैलजोडीचे विधिवत पूजन केले.
या वेळी बैलजोडी समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील, माजी उपनगराध्यक्ष रामदास भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, सागर भोसले, ज्ञानेश्वर गुळुंजकर, विष्णू वाघमारे, दादा काटे, विलास घुंडरे, सदस्य, नगरसेवक, आळंदीकर ग्रामस्थ, देवस्थान सेवेकरी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.