

सासवड: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू श्री संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ऐतिहासिक चांदीच्या पालखीला आणि रथाला आकर्षक झळाळी देण्याचे काम सध्या समाधी मंदिर परिसरात सुरू आहे. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या पालखी सोहळ्याच्या तयारीमुळे सासवडमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
येथील तयारीबाबत पालखी सोहळाप्रमुख विश्वस्त ॲड. त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी माहिती दिली. त्यानुसार, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पायी पालखी सोहळा शनिवारी (दि. ११) सासवड येथे मुक्कामी येणार आहे. त्यानिमित्त श्री संत सोपानदेव मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व आवश्यक व्यवस्था युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.
श्री संत सोपानदेव महाराजांच्या चांदीच्या पालखीला विशेष प्रकारचे लेपण करून तिची झळाळी वाढविण्यात येत आहे. तसेच, पालखीचा रथ, त्याची चाके आणि इतर यांत्रिक भागांची दुरुस्ती व देखभालही सुरू आहे. पालखी सोहळा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा, यासाठी सर्व बाबींवर बारकाईने लक्ष दिले जात आहे.
याचबरोबर मंदिर परिसरातील विकासकामांनाही गती देण्यात येत आहे. संत सोपानकाका सहकारी बँकेने या कामांसाठी १८ लाख रुपयांची देणगी दिली. देऊळवाड्यात श्री दत्त मंदिर आणि संत मुक्ताबाई मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, संत तुकाराम महाराजांच्या ओट्याचे कामही पूर्णत्वास गेले आहे. या विकासकामांमुळे मंदिर परिसर अधिक सुशोभित आणि भाविकांसाठी सुविधायुक्त होत आहे.
श्री संत सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सासवड येथून रविवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता समाधी मंदिरातून प्रस्थान होणार असल्याचे पालखी सोहळाप्रमुख विश्वस्त ॲड. त्रिगुण गोसावी यांनी सांगितले. या वेळी मंदिराचे व्यवस्थापक गौतम महाराज गोसावी, विश्वस्त श्रीकांतकाका गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे, ह.भ.प. अभय महाराज जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.