

बारामती: कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस जोरदार बरसत असला, तरी बारामतीसह शेजारील तालुके अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जून महिना संपूनही तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असला, तरी तो शेतीची तहान भागविण्यास अपुरा ठरत आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी अद्यापही पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. दरवर्षी जून अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरून वाहणारे ओढे, नाले आणि तळी यंदा अजूनही कोरडेच आहेत. विहिरींच्या पाणीपातळीतही लक्षणीय घट झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसाअभावी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याचे दरही गगनाला भिडले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण आहे. संततधार पावसामुळे उष्णतेचा चटका कमी झाला असला, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित मुसळधार पाऊस अद्याप झालेला नाही. धरण क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने काही प्रमाणात आशा निर्माण झाली असली, तरी खरीप हंगामासाठी जोरदार पावसाची गरज आहे.
सोमेश्वर व माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवड हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, वीर धरणाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेली ऊसशेती धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे अडचणीत आली आहे. बागायती पट्ट्यातील शेतकरीही पाण्याअभावी चिंतेत आहे. विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
मंगळवारी पालखी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. दरवर्षी अनेक शेतकरी पेरण्या पूर्ण करूनच वारीला जातात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने पेरण्या न करताच अनेकांनी वारीचा मार्ग धरला आहे. आता पांडुरंगाच्या कृपेने लवकरच मुसळधार पाऊस पडावा आणि शेतीला जीवदान मिळावे, अशीच अपेक्षा बारामती तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.