Wari Pudhari
पुणे

Alandi Kartiki Wari 2026: आळंदी कार्तिकी वारीचे वेळापत्रक जाहीर; ४ डिसेंबरला कार्तिक एकादशी, ६ डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा

१ डिसेंबरपासून हैबत बाबा पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ; ८ डिसेंबरला नगरप्रदक्षिणा आणि छबिना मिरवणुकीने सांगता

पुढारी वृत्तसेवा

आळंदी: आळंदी कार्तिकी वारी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास १ डिसेंबरपासून भक्तिमय वातावरणात गुरुवर्य हैबत बाबा पायरी पुजनाने प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा शुक्रवारी (४ डिसेंबर) तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा रविवारी (६ डिसेंबर) होणार आहे.

कार्तिकी वारीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कार्तिक एकादशीला (४ डिसेंबर) माउलींच्या संजीवन समाधीवरील पहाट पूजा १२ ब्रह्मवृंदांचे वेदघोषात होईल. एकादशीला समाधी मंदिर दिवसभर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल.

यानंतर पालखी रात्री नऊ वाजता मंदिरात परंपरेनुसार परतल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा आणि धुपारती होईल. द्वादशीनिमित्त शनिवारी (५ डिसेंबर) प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पहाटे साडेतीनच्या सुमारास पार पडेल. दुपारी चार वाजता परंपरेप्रमाणे रथोत्सवासाठी माउलींची पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडेल.

समाधी सोहळा दिनी रविवारी (६ डिसेंबर) पहाटे तीन ते चारदरम्यान प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते समाधीवर पवमान अभिषेक, दूध आरती झाल्यावर मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी पाच ते साडेनऊ माउलींच्या चल पादुकांवर भाविकांच्या पूजा होतील. सकाळी सात ते नऊ महाद्वारात हैबत बाबांच्या पायरी पुढे कीर्तन तर वीणा मंडपामध्येही कीर्तनाचा कार्यक्रम होईल.

सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यत वीणा मंडपामध्ये संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन होईल. दुपारी ठीक बारा वाजता संजीवन समाधी दिन होणार आहे. मंगळवारी (८ डिसेंबर) रात्री माउलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा आणि छबिना मिरवणुकीने कार्तिकी वारी सोहळ्याची सांगता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT