केंदुर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाबळ गटातील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी त्यांनी आपल्या गत आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे पाबळ गटातील उमेदवार प्रफुल्ल शिवले म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अकाली मृत्यची बातमी कानी पडली व आपल्याला मोठा धक्का बसला. दादांचा राज्याच्या विकासामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा होता. कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये आणण्यात त्यांचे योगदान मोठे होते. आमच्यासारखे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते दादांच्या कार्य कर्तुत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित झाले होते. प्रामुख्याने माझ्या पाबळ केंदुर गटात दादांनी उभे केलेले रस्त्याचे जाळे,महावितरणचे सबस्टेशन , ग्रामीण रुग्णालय, विविध विकास कामे त्यांच्या कामाची साक्ष देतात. पाबळ केंदूर गावांना वरदान ठरणाऱ्या थिटेवाडी धरणाच्या निर्मितीमध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे शंभर टक्के योगदान आहे.
या वेळी पवारांच्या सूचनेनंतर अजित दादा पवार हे पाबळ या ठिकाणी पहाटे साडेपाचच्या दरम्यान धरण स्थळावर पोहोचले होते. हा त्यांच्या कामाचा आवाका होता. माझ्या पक्ष प्रवेशावेळी दादांनी माझ्या बाबत संपूर्ण माहिती घेतली. माझी समाजाप्रती असलेली निष्ठा कोविड काळात केलेले काम याची दखल दादांनी घेतली व मला पक्षाची पाबळ केंदुर गटातून उमेदवारी दिली. दादांनी मला दिलेली समाजाच्या सेवेची शिकवण मी जपणार असुन या भागाच्या विकासासाठी मी जी कामे करील हीच दादांसाठी माझी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
यावेळी बोलताना पाबळ पंचायत समिती गणातील उमेदवार वंदना प्रकाश पवार म्हणाल्या की शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आणण्यामध्ये दादांचा मोठा वाटा होता. ट्रान्सफॉर्मर, वीज, पाणी तसेच छोटे छोटे अडचणी आल्यास दादांच्या एका फोनवर कामे मार्गी लागत होती. दादांचा प्रशासनावर असलेला दबदबा यामुळे आमच्या सारख्यांची समाज उपयोगी कामे चुटकीसरशी मार्गे लागत होती.
केंदुर पंचायत समिती गणातील उमेदवार सुचिता रोहन थिटे म्हणाल्या की थिटेवाडी धरण हे शरदचंद्र पवार व अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आज पारंपारिक दुष्काळी असलेल्या केंदूर गावाची पिण्याच्या पाण्याची तसेच थोड्याफार प्रमाणात शेतीच्या पाण्याची समस्या या मुळे मार्गी लागली आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांची असलेली कटिबद्धता यातून अधोरेखित होत आहे.