

Ajit Pawar last rites: अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणाबद्दल ओळखले जात होते. त्यांच्या वक्तशीरपणाचे किस्से राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेचा विषय असतात. असाच वक्तशीरपणा त्यांच्या शेवटच्या प्रवासात देखील दिसला. ठरल्या प्रमाणे अजितदादांचे पार्थिव हे बरोबर ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर दाखल झालं. कोणताही वेळ न घालवता अंत्यविधीला देखील सुरूवात झाली. साधारणपणे १२ वाजता अजित पवार अनंतात विलीन झाले.
अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी त्यांचे मूळ गाव काटेवाडी इथं नेण्यात आलं होतं. त्यावेळी काटेवाडी येथील त्यांचा निवासस्थानी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. तिथं घराच्या अंगणात अजित पवार यांच्या पार्थिवाला शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. तिथंच पार्थिव तिरंग्यात पलटेण्यात आलं.
यानंतर अजित पवार यांची अंत्ययात्रा सुरू झाली. काटेवाडीतून अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झालं. यावेळी सजवण्यात आलेल्या गाडीत जय पवार आणि पार्थ पवार होते. या गाडीच्या मागे अजित पवारांवर प्रेम करणारे लोक धावत सुटले होते.
विशेष म्हणजे काल सायंकाळी अजित पवार यांच्यावर सकाळी ११ वाजता अंत्य संस्कार करण्यात येणार असे जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे बरोबर ११ वाजता दादांचे पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झाले.
यानंतर धार्मिक पद्धतीनं विधी करण्यात आले. पाठोपाठ शासकीय मानवंदना देखील देण्यात आली. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यातील मंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.
शासकीय मानवंदनेचे सोपस्कार पार पडल्यानंतर पार्थ आणि जय पवार यांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला. यानंतर उपस्थित जनसागरामधून अजित दादा अमर रहे.... अजित दादा परत या अशी घोषणा देण्यात आल्या.
अग्नी दिल्यानंतर जय पवार आणि पार्थ पवार यांनी उपस्थित जनसमुदयाला अन् दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेसमोर हात जोडून दादांवर केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जय आणि पार्थ हे दोघेही भावनिक झाले होते.