

काटेवाडी: काटेवाडी (ता. बारामती) येथील पवार फार्म परिसरात गुरुवारी (दि.२९) पहाटेपासूनच शोकाकुल वातावरण होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दर्शनासाठी व अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदायाची अलोट गर्दी उसळली होती. पहाटेच्या अंधारातच काटेवाडीच्या दिशेने लोकांची रीघ लागली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, कार्यकर्ते, नातेवाईक, पाहुणे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“एकच वादा… अजित दादा”, “अजितदादा अमर रहे”, “परत या… परत या” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला होता. विशेषतः महिलांच्या टाहोने वातावरण अधिकच भावनिक झाले. अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप दिला. कोणाच्या डोळ्यांत अश्रू होते, तर कोणाचे शब्द गळ्याशी अडकले होते. ‘आमचा माणूस गेला’ या भावनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते.
शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाला तिरंग्यात गुंडाळून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. उपस्थितांनी नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण केली. काटेवाडीपासून सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत जनसागर उसळला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ग्रामस्थांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी आपल्या लाडक्या दादाला अखेरचा सलाम केला. काटेवाडीने केवळ एक नेता नव्हे, तर आपल्या सुख-दुःखात सहभागी होणारा आपला माणूस गमावला असल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. लोकनेते आणि सामान्य जनतेचा आधारवड असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामती परिसरातून अत्यंत भावनिक वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. पहाटेपासूनच शोककळा पसरली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, ग्रामस्थ, कार्यकर्ते, नातेवाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्नी खासदार सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शर्मिला पवार, मुले पार्थ,जय , पुतण्या युगेंद्र भगिनी विजया, निता पाटिल, बंधू श्रीनिवास व राजेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबीय अंत्यसंस्कार विधीत सहभागी झाले होते. “एकच वादा… अजित दादा”, “अजितदादा अमर रहे”, “परत या दादा” अशा घोषणांनी आसमंत दाटून गेला. महिलांच्या टाहोने व जनतेच्या अश्रूंनी संपूर्ण परिसर भावनाविवश झाला होता.
शासनाच्या वतीने अजित पवार यांच्या पार्थिवाला तिरंग्यात गुंडाळून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. उपस्थितांनी नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानपर्यंत सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
अंत्ययात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा जनतेची प्रचंड गर्दी जमली होती. महिला भगिनी, वडीलधारी नागरिक, युवक-युवतींनी अश्रूंचा बांध मोकळा करत आपल्या लाडक्या दादांना अंतिम दर्शन केले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत श्रद्धांजली वाहण्यात आली. “हा केवळ नेता नव्हता, तो आमचा माणूस होता” अशी भावना प्रत्येक चेहऱ्यावर उमटत होती.
अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण बारामती तालुका सुन्न झाला आहे. जनतेच्या मनात कायम घर करून राहिलेला हा लोकनेता आज कायमचा निघून गेला, मात्र त्यांचे कार्य, विचार आणि आठवणी काटेवाडीसह बारामतीच्या जनमानसात सदैव जिवंत राहतील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.