पुणे: महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात ठाण मांडून होते. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटानंतर डेक्कन भागातील ताथवडे क्लार्क्स इन या हॉटेलमधील त्यांची पुण्यातील शेवटची पत्रकार परिषद ठरली. यावेळी ‘आमच्या मनगटात ताकद असून, पुणेकरांना दिलेले आश्वासन पूर्ण करू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. अजित पवार यांनी 30 ते 40 मिनिटे ही पत्रकार परिषद घेत पुणेकरांना आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच काही प्रश्नांची उत्तरे देताना हजरजबाबीपणाही दाखवला.
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्या तरी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर तुतारीचे चिन्ह नव्हते. याबाबत विचारले असता त्यांनी ग््राामीण शैलीत उत्तर दिले. “सगळं काही मीच बघू का?” असे म्हणत त्यांनी मिश्कील उत्तर दिले. त्यांच्या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. वेळ पडली तर भाजपसोबत जाणार का, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, “तुम्ही तो विचार का करता?” आमची महापालिकेत एकहाती सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच किती जागा निवडून येतील, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, “165 पैकी आम्ही दोघेच असू. दोन्ही महापालिकांमध्ये आमचाच महापौर होईल.” दिवस-रात्र जिवाचे रान केले आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, तो मतांत किती रूपांतरित होतो, हे पाहावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
मी बोललो तर हाहाकार माजेल
“1999 मध्ये आघाडीचे सरकार आल्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाची जबाबदारी माझ्याकडे आली. आधीच्या सरकारच्या काळात पुरंदर उपसा सिंचन योजनेचा खर्च 330 कोटी रुपये दाखवण्यात आला होता. मी तो कमी करून 220 कोटींवर आणला. त्यातील 100 कोटी पक्षनिधीसाठी आणि 10 कोटी अधिकाऱ्यांनी वाढवले होते, असे मला सांगण्यात आले. ही फाइल आजही माझ्याकडे आहे. हे प्रकरण बाहेर आले असते तर मोठा हाहाकार माजला असता,” अशी टीका अजित पवार यांनी 1995 च्या युती सरकारवर केली होती.
अजितदादा पवार यांच्याशी माझी ओळख ही केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर एक खेळाडू आणि क्रीडाप्रेमी या नात्याने होती. दादा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने त्यांचा खेळाप्रती असलेला दृष्टिकोन अतिशय व्यापक आणि संवेदनशील होता. खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याचे माध्यम आहे, ही त्यांची ठाम धारणा होती, अशा भावना कुस्तीपटू तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केल्या. त्यांच्या कार्यकाळात माझा तसेच इतर अनेक खेळाडूंचा त्यांच्या हस्ते सन्मान झाला होता. त्या प्रसंगी मला त्यांच्या हस्ते 12 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते. तो क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी होता. खेळाडूंना प्रोत्साहन देताना दादांचा उत्साह आणि आपुलकी नेहमीच जाणवत असे. 26 जानेवारीला शिवाजीनगर पोलिस ग््रााउंड येथे आयोजित ध्वजवंदन व संचलन कार्यक्रमात, मी त्यांच्या मागील वाहनात उभा होतो. त्या वेळी दादांनी वळून पाहत, ‘अरे, तू आहेस का?’ अशी आपुलकीने विचारणा केली. अजितदादांना खेळाची नितांत आवड होती. माझे कुस्तीतील वस्ताद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या नोकरीसाठीही त्यांनी स्वतः प्रयत्न केले होते. अजितदादांच्या अपघाताची बातमी जेव्हा कानावर आली, तेव्हा मी पूर्णपणे सुन्न झालो.
दादा म्हणाले, ‘अरे, याची हाइट बसते का?’
जेव्हा माझे डीवायएसपी पदाचे प्रशिक्षण सुरू होते, तेव्हा त्या प्रशिक्षण कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत हसत हसत, ‘अरे, याची हाइट बसते का?’ अशी गमतीशीर टिप्पणी केली होती. त्यावर मीही आदरपूर्वक आणि हसत उत्तर दिले होते, ‘हो दादा, माझी हाइट बसते.’ तो संवाद आजही आठवला की मनात आपुलकीची भावना दाटून येते, अशी भावना सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांनी व्यक्त केली.