Ajit Pawar Pudhari
पुणे

Ajit Pawar Last Program: बारामतीतील कन्हेरी येथील प्रचाराचा शुभारंभ ठरला अजित पवारांचा अखेरचा कार्यक्रम

मारुतीरायाच्या साक्षीने विकासाचा संदेश देणारे भाषण इतिहासात नोंदले गेले

पुढारी वृत्तसेवा

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (दि. 24) रोजी कन्हेरी (ता. बारामती) येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ हा बारामतीतील अखेरचा कार्यक्रम ठरला. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने दि. 17 जानेवारी पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर दि. 24 रोजी बारामती दौऱ्यावर येत प्रचाराचा शुभारंभ केला होता.

कन्हेरीचा मारुतीराया हे पवार कुटुंबीयांच्या श्रद्धेचा विषय. 1967 सालापासून पवार कुटुंबीय प्रत्येक निवडणुकीचा शुभारंभ मारुतीरायाला श्रीफळ फोडूनच आजवर करत आले आहे. अगदी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत दोन्ही पवार एकमेकांविरोधात उभे ठाकले असतानाही दोन्ही गटांनी येथूनच प्रचाराची सुरुवात केली होती.

कन्हेरी ही अलीकडील काळात निर्माण झालेली ग््राामपंचायत आहे. पवारांच्या काटेवाडीतीलच हा एक भाग होती. सुरुवातीपासूनच पवार कुटुंबिय नेहमी बारामतीत आले की कन्हेरीच्या दर्शनाला जात असे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कन्हेरीत शेती आहे. याशिवाय त्यांचे बंधू श्रीनिवास पवार हे कन्हेरीतच राहत असल्याने पवारांचे गाव अशीच या गावाची ओळख आहे.

पवार यांनी येथूनच शनिवारी तालुक्याच्या पुढील विकासाची दिशा स्पष्ट केली होती. ‌‘वाद टाळा, एकत्र या‌’ असे आवाहन त्यांनी या वेळी विरोधकांना केले होते. ‌‘केंद्र व राज्यात आपण एनडीए म्हणून एकत्र आहोत. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद टाळणे गरजेचे आहे. बारामती व माळेगावमध्ये मी चांगल्या हेतूने बेरजेचे राजकारण केले. एकमेकांना विरोध करून काहीही साध्य होणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे,‌’ असे पवार या वेळी भाषणात म्हणाले होते. बारामती शहर, तालुक्यात त्यांनी आजवर हजारो सभा घेतल्या. पण त्यांचे शनिवारी (दि. 24 जानेवारी) कन्हेरीतील भाषण अखेरचे भाषण ठरले.

अंकुशराव, मी बीडला निघालोय, तुम्ही सगळं व्यवस्थित करून घ्या..., महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, असे सांगून बीडला गेलेल्या अजितदादांशी नंतर बोलताच आले नाही..., अशी व्यथा राष्ट्रवादी काँग््रेासचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी बुधवारी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग््रेासच्या दोन्ही गटांनी एकत्रितपणे महापालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यावर जागावाटपाच्या चर्चेसाठी सकाळी 9 पासून रात्री अडीच वाजेपर्यंत आपण दादांबरोबर होतो. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजितदादांना बीडला जायचे होते. निघताना ते म्हणाले, अंकुशराव, मी बीडला निघालोय, तुम्ही सगळं व्यवस्थित करून घ्या, असे सांगून सर्व जबाबदारी सोपवून दादा गेले. दादांची व माझी ही अखेरची भेट ठरेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असेही काकडे म्हणाले.

अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक उमदा, राज्याच्या प्रशासनावर भक्कम पकड असणारा स्पष्टवक्ता नेता आपण गमावला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने केवळ बारामतीचीच नाही, तर संपूर्ण राज्याची हानी झाली आहे. बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या लोकांची नाडी ओळखणाऱ्या नेत्याने महाराष्ट्राला आणखी पुढे नेले असते, पण नियतीला ते मान्य नव्हते. त्यांच्या जाण्याने राज्याची व कार्यकर्त्यांची अपरिमित हानी झाली आहे. एका जवळच्या व आवडत्या नेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत काकडे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT