पुणे: देशभरात अजित पवार यांचे नाव आदराने घेतले जात होते. चार दशके जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या नेत्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आणि विकासाची इच्छा भविष्यात पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रामाणिक प्रयत्न करू, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. अजित पवारांची उणीव कायम भासत राहील, असे सांगताना ते भावुक झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुणेकरांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरमध्ये बुधवारी शोक सभा आयोजित केली होती, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार सचिन अहिर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, चित्रपट दिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, विद्या येरवडेकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बिजमोहन पाटील यांच्यासह राजकारण, प्रशासन, साहित्य, कला, उद्योग आणि समाजकारणातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, जमिनीशी नाळ जोडलेला, उत्तम आणि शिस्तप्रिय असा नेता म्हणजे अजित पवार. त्यांनी जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास संपादन केला होता. देशातील एक ताकदवान नेता गेला, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. विकासकामात कधीही राजकारण न करणारे अजित पवार होते, अशी माणसे खूप दुर्मीळ असतात. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अजित पवारांच्या कामाची ओळख करून देणारे स्मारक उभारले पाहिजे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, परिणामांची पर्वा न करता निर्णय घेण्याचे धाडस दादांकडे होते. कोणतेही खाते असो, ते आत्मसात करून काम करणारा नेता आपल्यातून गेला. डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, शरद पवार यांच्यातील सर्व गुण अजित पवारांकडे होते. तरुणांनी त्यांच्याकडून सकाळी लवकर उठणे आणि वक्तशीरपणा शिकायला हवा.
विठ्ठल मणियार म्हणाले, पवार कुटुंबाला हा खूप मोठा धक्का आहे. त्यांची मुले पार्थ आणि जय सावरत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना पोरकेपणा जाणवू देऊ नये, ही सर्वांची जबाबदारी आहे. झंझावात निघून गेला; आता तो भरून निघेल, असे वाटत नाही.
नवल किशोर राम म्हणाले, ते आदर्श नेते होते. सकाळी सात वाजता फोन करून कामाबद्दल विचारणारा नेता आता राहिला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मंजुळे म्हणाले की, ही पोकळी महाराष्ट्र कशी भरून काढेल, हे सांगता येत नाही. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या कामकाजाला गती देण्यात अजित पवारांनी दिलेल्या सहकार्याची आठवण सांगितली. सूत्रसंचालन अंकुश काकडे यांनी केले.
मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
तसेच यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ विद्याधर अनासकर, शिक्षण प्रसारक मंडळांचे ॲड. एस. के. जैन, कबड्डीपटू शांताराम जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबद्दल जाहीर सभेत बोललो होतो. यानंतर सुनेत्रा पवार यांनी फोन करून तुम्ही प्रचाराला येऊ नका, असे सांगितले होते.चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री