बारामती: “जगाला हेवा वाटेल असा अजितदादांच्या जीवनावरील चित्रपट तयार करणार आहे,” असा निर्धार लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला. “इतक्या बेशिस्त देशामध्ये पहाटे सहा वाजता उठून कामाला सुरुवात करणारा असा एक नेता होता. आज मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही दादांची आठवण येत असेल,” अशा शब्दांत त्यांनी स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन केले.
पुणे येथे जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 'नांदी' म्हणून बुधवारी (दि. २८ नोव्हेंबर) बारामतीत आयोजित एकांकिका साहित्य संमेलनांतर्गत शारदानगर येथील डॉ. आप्पासाहेब पवार सभागृहातील तिसऱ्या सत्राच्या प्रकट मुलाखतीत तरडे बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद बारामती शाखा, नटराज नाट्य कला मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बारामती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातील सकाळचे सत्र कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक व एकांकिकाकार राज काझी होते. स्वागताध्यक्षपद ॲड. प्रिया गुजर-महाडिक यांनी भूषविले. विवेक पांडकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून प्रवीण तरडे यांनी कलात्मक प्रवासाबरोबरच अजितदादांविषयीच्या आठवणी उलगडल्या.
अजितदादांचे व्यक्तिमत्त्व हा चित्रपटाचा विषय असल्याचे सांगताना तरडे यांनी त्यांच्या विलक्षण शिस्तीचा, स्पष्टवक्तेपणाचा आणि सामान्य नागरिकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा विशेष उल्लेख केला. चित्रपट करण्यासंदर्भात अजितदादांशीही आपले बोलणे झाले होते, असे त्यांनी सांगितले.
अजितदादांच्या कार्यपद्धतीबाबत ते म्हणाले, राज्यभरातून नागरिक त्यांच्याकडे कामे घेऊन येत असत; मात्र त्यांच्या टेबलावर फायली पडून राहत नसत. एखादे काम होणार नसेल, तर त्याबाबतही ते संबंधित व्यक्तीला तिथेच स्पष्टपणे सांगत. नागरिकांनी विनाकारण हेलपाटे मारून आपला वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवू नयेत, याची त्यांना जाणीव होती.
राज्यातील प्रश्नांची अजितदादांना सखोल माहिती होती. आपल्यापर्यंत आलेला माणूस कोणत्या परिस्थितीतून आला आहे, त्याच्या अडचणी आणि अपेक्षा काय आहेत, हे त्यांना समजत होते. त्यांच्या परखड बोलण्यामागे निर्मळ मन आणि काम मार्गी लावण्याची तळमळ होती. या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट का निघू नये? असा प्रश्न तरडे यांनी केला.
नटराज नाट्य कला मंडळाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते त्यांनी उलगडले. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले. तिसऱ्या सत्राला ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते रोप व सन्मानचिन्ह देऊन तरडे यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. अमरेंद्र महाडिक यांनी प्रवीण तरडे यांचा परिचय करून दिला.