तज्ज्ञांचा इशारा
कर्करोग जनजागृती दिवस (7 नोव्हेंबर)
पुणे: वायू प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढत असल्याची गंभीर बाब आरोग्य तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. कर्करोग जनजागृती दिनानिमित्त ( 7 नोव्हेंबर) तज्ज्ञांनी स्वच्छ हवेचे महत्त्व पटवून देत, पर्यावरणाचे रक्षण करणे म्हणजेच आरोग्याचे रक्षण असल्याचा संदेश दिला आहे. (Latest Pune News)
आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने वायू प्रदूषणाला ‘ग्रुप 1 कार्सिनोजेन’ म्हणजेच मनुष्यासाठी निश्चितपणे कर्करोग निर्माण करणारे घटक म्हणून घोषित केले आहे. हवेतील अतिसूक्ष्म धुलिकण फुफ्फुसांच्या खोल भागात जाऊन पेशींचे नुकसान करतात. त्यामुळे दाह, डीएनए बदल आणि अखेरीस कर्करोग होण्याची प्रक्रिया सुरू होते.
धूम्रपान न करणार्या व्यक्तींमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये वायू प्रदूषण हा मुख्य घटक ठरत आहे. पाण्यातील आर्सेनिकसारख्या रसायनांमुळे मूत्राशय आणि त्वचेचा कर्करोग, तर रेडॉन वायू, एस्बेस्टॉस, डिझेल धूर, सिलिका यांसारख्या घटकांशी काम करणार्या लोकांमध्ये मेसोथेलिओमा किंवा इतर गंभीर कर्करोग दिसून येतात. घरगुती प्रदूषण, कोळशाचा धूर आणि निष्क्रिय धूम्रपानही धोका वाढवतात.
कर्करोगतज्ज्ञ डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, ‘शुद्ध हवा हा प्रत्येकाच्या आरोग्याचा मूलभूत हक्क आहे. कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर प्रत्येकाने प्रदूषण नियंत्रणात स्वतःचा वाटा उचलला पाहिजे. कर्करोग जनजागृती दिवसाच्या निमित्ताने वाढते प्रदूषण आणि कर्करोगाचा धोका हा प्रत्येक नागरिकासाठी एक इशारा आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ सवयी राखल्यासच कर्करोगापासून बचाव शक्य आहे.
वायू प्रदूषण हे कर्करोगाचे एक प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. हवेतील अतिसूक्ष्म धुलिकण श्वासावाटे फुफ्फुसांच्या खोलवर भागात जातात. यामुळे पेशींचे नुकसान होते आणि कर्करोगाची शक्यता निर्माण होते. वायू प्रदूषणामुळे, धूम्रपान न करणार्या तरुणांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांव्यतिरिक्त स्तनाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, तोंड आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.डॉ. नागेश शिरसाट, कर्करोगतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक