Robotic Surgery Pudhari
पुणे

Pune AI Robotic Surgery: एआय आणि रोबोटिक सर्जरीची क्रांती; पुण्यात कर्करोग उपचार अधिक अचूक आणि सुरक्षित

रुबी हॉल व सह्याद्री रुग्णालयातील तज्ज्ञांचे स्पष्टीकरण – मशीन नाही, अंतिम निर्णय डॉक्टरांचाच; कमी वेदना, जलद बरे होण्याचे फायदे

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. रुग्णालयांत एआय आधारित शस्त्रक्रिया आणि रोबोटिक सर्जरी या संज्ञा सर्रास ऐकू येत आहेत. तपासणी, निदान आणि उपचारांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स) तसेच शस्त्रक्रियेत एआय आणि रोबोटिक सर्जरीचा परस्परपूरक वापर होत आहे.

त्यामुळे अचूकता, वेळेत बचत, वेदनाविरहित उपचार करणे शक्य झाले आहे. मात्र, मशिन किंवा रोबो स्वतः निर्णय घेऊन शस्त्रक्रिया करतात का? याबाबत रुग्णांमध्ये संभम पाहायला मिळतो. प्रत्यक्षात, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी अंतिम निर्णय आणि जबाबदारी डॉक्टरांचीच असते, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणारी यंत्रणा नसून, ती डॉक्टरांना मदत करणारी संगणकीय प्रणाली आहे. रुग्णाचे सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रेसारखे तपासणी अहवाल एआयद्वारे विश्लेषित केले जातात. त्यातून आजाराची अचूक माहिती, संभाव्य धोके, रक्तस्रावाची शक्यता किंवा महत्त्वाच्या नसांचे स्थान, याबाबत डॉक्टरांना आधीच सूचना मिळतात. त्यामुळे शस्त्रक्रियेचे नियोजन डॉक्टरांना अधिक सुरक्षित आणि अचूक करता येते. दुसरीकडे, रोबोटिक सर्जरीमध्ये प्रत्यक्ष शस्त्रक्रिया रोबोटिक हातांद्वारे केली जाते. तरीही हा रोबोट स्वयंचलित नसतो. शल्यचिकित्सक एका कन्सोलवर बसून प्रत्येक हालचाल स्वतः नियंत्रित करतो. या पद्धतीमुळे अतिशय सूक्ष्म हालचाली शक्य होतात, हाताचा कंप कमी होतो आणि कमी छेदांमधून शस्त्रक्रिया करता येते. परिणामी, रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्राव, जलद बरे होणे आणि रुग्णालयात कमी दिवस थांबावे लागणे, असे फायदे मिळतात.

एआय काय करतो?

  • सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रेचे योग्य विश्लेषण

  • शस्त्रक्रियेतील गुंतागुंत आणि जोखीम ओळखण्यास मदत

  • शस्त्रक्रियेच्या नियोजनात मदत

  • अचूक वैद्यकीय पार्श्वभूमीची नोंद ठेवणे सोपे

  • शस्त्रक्रियेदरम्यान रिअल टाइम अलर्ट देण्यास मदत

रोबो काय करतो?

  • अचूक हालचाली

  • हातांमधील थरथर कमी करून नेमकेपणा आणणे

  • छोट्या छेदांच्या शस्त्रक्रियांमध्ये अचूकता

  • शस्त्रक्रियेदरम्यान अधिक लवचिकता व नियंत्रण

एआय आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा प्रगत नमुना म्हणजे रुबी हॉल क्लिनिकमध्ये नुकतीच सुरू केलेली प्रोस्टेट कर्करोगासाठी हाय-इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड ही उपचारपद्धती आहे. यामध्ये शस्त्रक्रिया किंवा रेडिएशनशिवाय उपचार करता येतात. रिअल टाइम मार्गदर्शनामुळे आजूबाजूच्या निरोगी ऊतकांचे संरक्षण होते. ही प्रक्रिया सहसा डे-केअर पद्धतीने केली जाते, त्यामुळे कमी रक्तस्राव, जलद बरे होणे आणि लघवी व लैंगिक कार्यक्षमता जपण्यास मदत होते. एआय आणि रोबोटिक तंत्रज्ञानाच्या एकत्रित वापरामुळे कर्करोग उपचारात अचूकता, सुरक्षितता आणि रुग्णांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होत आहे.
डॉ. हिमेश गांधी, संचालक, रोबोटिक सर्जरी, रुबी हॉल क्लिनिक
एआय आणि रोबोटिक तंत्रज्ञान आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात निदान आणि शस्त्रक्रियेमध्ये क्रांतिकारी ठरत आहे. सध्या एआय हे रिअल-टाइम डेटा विश्लेषणासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन ठरत आहे. इमेजिंग चाचण्या, प्रयोगशाळेचे अहवाल आणि रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, यांसारख्या मोठ्या प्रमाणातील माहितीचे एआय जलद विश्लेषण करून नमुने ओळखते आणि डॉक्टरांना आजारांचे लवकर निदान करण्यास मदत करते. दुसरीकडे, रोबोटिक तंत्रज्ञान प्रामुख्याने शस्त्रक्रियेमध्ये वापरले जाते. रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे अचूकता वाढते.
डॉ. संजय कोलते, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT