प्रसाद जगताप
पुणे: एकेकाळी प्रेमाची पत्रे लिहिण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करताना तरुणांची घाबरगुंडी उडायची. कागदावरचे शब्द खोडून पुन:पुन्हा नवीन मजकूर लिहिला जायचा. मात्र, बदलत्या काळानुसार आता पुण्याच्या महाविद्यालयांमधील ‘व्हॅलेंटाइन डे’चे स्वरूपही बदलले आहे. आपल्या मनातील आशा व्यक्त करण्यासाठी तरुणाई आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) ची मदत घेत असून, यामुळे प्रपोज करण्याची पद्धत अधिक सर्जनशील आणि सोपी झाली आहे.
एसपी कॉलेज असो वा फर्ग्युसन किंवा अन्य शहरातील अन्य कोणतेही कॉलेज असो, सध्या तरुणांमध्ये एआय टूल्सचा वापर केवळ अभ्यासासाठीच नाही, तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठीही केला जात असल्याचे समोर येत आहे. ‘
व्हॅलेंटाइन डे’निमित्ताने भावना कशा व्यक्त करायाच्या, याचे मार्गदर्शन तरुणाई एआयकडून घेत आहे. एखाद्या तरुणीला ग््रेास यांच्या कविता आवडत असतील किंवा इंदिरा संतांची हळुवारता भावत असेल, तर एआय त्या आवडीनुसार शब्दांची गुंफण करून देते. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाला साजेसा असा कस्टमाइज्ड मेसेज तयार करणे, आता एका क्लिकवर शक्य झाले आहे.
साहित्याची डिजिटल जोड
22 वर्षीय तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मला तिला प्रपोज करायचे होते, तिला साहित्याची आवड आहे, हे मला ठाऊक होते. त्यासाठी मी एआयची मदत घेऊन ग््रेास आणि इंदिरा संतांच्या शैलीतील कविता सुचवून घेतल्या. यामुळे मला माझ्या भावना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करता आल्या.’
एआय हे फक्त तंत्रज्ञान नसून भावना व्यक्त करण्याचे एक आधुनिक माध्यम आहे. तंत्रज्ञानामुळे संवाद अधिक प्रगल्भ होत असला, तरी त्यातला माणुसकीचा स्पर्श टिकवून ठेवण्याचे आव्हान मात्र तरुणाईसमोर आहे. एकूणच, यावर्षीच्या ’व्हॅलेंटाईन डे’ला पुण्याच्या कट्ट्यांवर शब्दांची उणीव भासणार नाही; कारण प्रत्येक प्रेमाच्या गोष्टीला आता एआयची स्मार्ट साथ लाभली आहे.आशिष कदम, तरुण