पुणे : पुण्यातील सीडब्ल्यूपीआरएस (मध्यवर्ती जल तथा विद्युत संशोधन केंद्र) आणि डीआयएटी (संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था) यांनी मंगळवारी (दि.18) सामंजस्य करार करून एका महत्त्वाच्या शैक्षणिक आणि संशोधन भागीदारीला सुरुवात केली. सीडब्ल्यूपीआरएस चे संचालक डॉ. प्रभात चंद्र आणि डाएटचे कुलगुरू डॉ. नारायण मूर्ती यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
धरणांचे प्रगत इन्स्ट्रूमेंटेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र-अध्ययन, हायड्रॉलिक संशोधन, पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन, संरचनेवर देखरेख, दूरसंवेदन, उपयोजित भूशास्त्रे अशा परस्पर स्वारस्याच्या क्षेत्रांत आणि संयुक्तपणे मान्य केलेल्या इतर क्षेत्रात सहयोग घडवून आणण्यासाठी एक सुरचित आराखडा या करारामुळे मिळणार आहे.
सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक डॉ. प्रभात चंद्र यांनी या वेळी सांगितले की, सीडब्ल्यूपीआरएस आणि डीआयएटी यांच्या परस्परपूरक सामर्थ्याच्या आधारे उभ्या राहणाऱ्या एका महत्त्वाचा भागीदारीला या सामंजस्य कराराने बळ मिळाले आहे. डीआयएटी चे कुलगुरू डॉ. नारायण मूर्ती म्हणाले, आमच्या सहयोगाने अर्थपूर्ण आंतरविद्याशाखीय संशोधन शक्य होईल आणि वैज्ञानिक शोधाची नवी दालने खुली होतील.
सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर डीआयएटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी-हायड्रोलिक प्रतिमाने, किनारी प्रक्रिया, इन्स्ट्रूमेंटेशन आणि संख्यात्मक सिम्युलेशन या बाबतींतील सीडब्ल्यूपीआरएस च्या विशेष क्षमतांचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने- विविध प्रयोगशाळा आणि भौतिक प्रतिमान सुविधांची पाहणी केली.