AI Dindi Wari Pudhari
पुणे

Ashadhi Wari Digital Coverage: एआयच्या साथीने वारीचा भक्तिरंग जगभर; पालखी सोहळ्याचे क्षण सोशल मीडियावर थेट

फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबवरून लाखो भाविकांपर्यंत पोहोचतेय पालखीची माहिती; आधुनिक तंत्रज्ञानातून वारकरी परंपरेला नवा आयाम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: टाळ-मृदंगांचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि भक्तीच्या ओढीने पंढरीकडे निघालेली संतांची वारी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी होता न येणाऱ्या देशविदेशातील भाविकांपर्यंत पालखी सोहळ्याचे दर्शन आणि माहिती पोहचविण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर केला जात आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स, अधिकृत संकेतस्थळ आणि रील्सच्या माध्यमातून वारीचा प्रत्येक क्षण जगभर पोहचविण्यात येत आहे.

पालखी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, छायाचित्रे, व्हिडीओ, रील्स तसेच मुक्काम, मार्ग, वेळापत्रक आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. यासाठी पालखी सोहळा समित्यांनी स्वतंत्र सोशल मीडिया टीम तयार केली असून, छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर्स वारीतील प्रत्येक महत्त्वाचा क्षण टिपून तो तत्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहचवत आहेत. यंदाच्या वारीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एआयचा वाढता वापर. माहितीपर पोस्टर्स, आकर्षक छायाचित्रे, व्हिडीओच्या माध्यमातून पालखीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वारीची संस्कृती-परंपरा जगभरातील लोकांपर्यंत पोहचत आहे.

आयटी आणि एआय दिंडीचे सदस्य जोतिबा पवार म्हणाले, आयटी आणि एआय दिंडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. संकेतस्थळाद्वारे दिंडीचे रोजचे नियोजन वारकऱ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. तसेच एआयच्या साहाय्याने तयार केलेली पोस्टर्स, छायाचित्रे, व्हिडीओ आणि विविध माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर प्रसिद्ध केली जात आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी झालेले वारकरीही स्वतःचे अनुभव, रील्स आणि व्हिडीओ शेअर करून अधिकृत हँडलला टॅग करीत असल्याने वारीतील भक्तिरंग देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहचत आहे.

पालखी सोहळ्यातील प्रत्येक क्षण भाविकांपर्यंत

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याचा प्रत्येक महत्त्वपूर्ण क्षण अधिकृत फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहचवला जात आहे.

यासाठी समितीने स्वतंत्र सोशल मीडिया टीम तयार केली असून, रोजच्या वारीतील घडामोडी, प्रत्येक क्षणाची छायाचित्रे, व्हिडीओ, रील्स तसेच आवश्यक सूचना नियमितपणे प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यामुळे देश-विदेशातील लाखो भाविक घरबसल्या पालखी सोहळ्याचा भक्तिमय अनुभव घेत आहेत. या डिजिटल उपक्रमामुळे वारकरी परंपरेचा संदेश आणि वारीचे सांस्कृतिक वैभव जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहचत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT