

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी पुण्यात आगमन झाल्यानंतर लाखो वारकरी आणि भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होताच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेत अवघ्या एका रात्रीत संपूर्ण पालखी मार्ग पूर्ववत स्वच्छ केला. या मोहिमेत ११२० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत तब्बल २७१ मे. टन कचऱ्याचे संकलन केले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले, की महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतील ११२० कर्मचारी आणि स्वच्छता सेवकांनी रात्रभर विशेष मोहीम राबवून पालखी मार्गावरील कचरा उचलला. या मोहिमेत ५४ मे. टन ओला आणि २१७ मे. टन सुका कचरा, असा एकूण २७१ मे. टन कचरा वेगळा करून संकलित करण्यात आला.
संकलित कचऱ्यामध्ये प्लास्टिक तसेच वापरून टाकलेल्या चपलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले. पालखी मार्ग सकाळपर्यंत पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रात्रभर परिश्रम घेतले.
वारकरी भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
याशिवाय, वारकरी भाविकांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी, तसेच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली.