पुणे

इंदापूर : गलांडवाडी परिसरातील शेतात अघोरी पूजा

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. २ गावातील शिंदेवस्ती येथील शेतामध्ये अमावस्या-पोर्णिमेला अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात हनुमंत माणिक शिंदे (रा. शिंदे वस्ती, गलांडवाडी नंबर 2, ता. इंदापूर) यांनी मंगळवारी (दि. 25) फिर्याद दिली आहे.

शिंदे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 14 जानेवारी रोजी शिंदेवस्तीत असणार्‍या गट नंबर 126 मधील शेतात असलेल्या मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलो असता, तेथे नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, हळदी कुंकू, अंडी, नैवेद्य, गांधी टोपी, बागायतदार, अगरबत्ती, कापूर असे साहित्य दिसून आले. हा प्रकार पाहिल्यानंतर घरी येऊन कुटुंबातील सदस्यांना विचारणा केली असता कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींनी अशी पूजा केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील सदस्य व मी स्वतः शेतात त्या ठिकाणी गेलो पाहणी केली. त्यानंतर त्या ठिकाणी असणारे पूजेचे मांडलेले साहित्य मी उचलून बाजूला टाकून दिले.

दरम्यान, वहिनी रत्नप्रभा यांनी सांगितले की, यापूर्वीही आपल्या शेतात अशाच प्रकारे अमावस्या-पौर्णिमेला कोणीतरी बऱ्याच वेळा पूजा केली होती. त्यामुळे अज्ञाताने जाणून-बुजून आमच्या कुटुंबात आर्थिक नुकसान व्हावे, घरात मृत्यू व दुखापत घडवण्याच्या उद्देशाने भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या शेतात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा करून आमच्या शेतात वारंवार पूजा-अर्चा केल्याचे दिसून आल्याने तक्रार देत असल्याचे शिंदे यांनी फिर्यादित नमूद केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT