Illegal Hill Cutting Pudhari
पुणे

Illegal Hill Cutting: अगळंबे परिसरात अवैध डोंगरफोड; खडकवासला धरणाला गाळ व दरडींचा धोका

प्लॉटिंगसाठी जेसीबीने मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू; पावसात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा गंभीर धोका

पुढारी वृत्तसेवा

वेल्‍हे: अगळंबे (ता. हवेली) येथे प्लाॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. जेसीबी मशीनरीच्या साह्याने डोंगराची कत्तल सुरू आहे. त्यामुळे श्रीजीत मंगल कार्यालयाजवळील अगळंबे मुख्य रस्त्यासह शेती उद‌्ध्वस्त होण्याचा धोका आहे. मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्यामुळे तोडलेल्या डोंगराचा राडारोडा, दगड, माती जोरदार पावसात वाहून खडकवासला धरणात येणार आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे.

विनापरवाना मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून प्लाॅटिंगसाठी रस्ता तयार केला जात आहे. त्यासाठी पायथ्यापासून माथ्यापर्यंत डोंगर तोडला जात आहे. त्यामुळे तोडलेल्या डोंगराचे उघडे पडलेले खडक, मुरुम, ढिसूळ भाग उन्मळून दरडी कोसळण्याची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

मुख्य रस्त्यासह लोकवस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका

खडकवासला धरणाच्या डाव्या तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर, मणेरवाडी, सोनापूर , आंबी तसेच धरणाच्या उजव्या तीरावरील कुडजे, अगळंबे, मांडवी, सांगरुणपासून जांभली आदी ठिकाणी प्लाॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्या तोडल्या जात आहेत.

दोन वर्षांपूर्वी सोनापूर येथे तोडलेल्या डोंगराच्या दरडी पुणे-पानशेत रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक कोलमडली होती. प्लाॅटिंगसाठी बेकायदा डोंगर फोडून रस्ता बांधकामे सुरू आहेत. तोडलेल्या डोंगराच्या दरडी जवळील घरे, हॉटेल, लोकवस्त्यावर कोसळण्याचा धोका वाढला आहे. दुसरीकडे प्रशासन सुस्त असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

अगळंबे येथे प्लाॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खनाची तातडीने पाहणी करण्याचे आदेश स्थानिक तलाठ्यांना दिले आहेत. सोमवारी (दि. २९) समक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात येणार आहे. बेकायदा उत्खनन केल्याचे निष्पन्न झाल्यास महसूल अधिनियम कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अर्चना निकम, तहसीलदार, हवेली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT