

खडकवासला: शहर आणि जिल्ह्यात सर्वाधिक वेगाने मतदार संख्या वाढलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान सुमारे दोन लाख दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याचे प्राथमिक पडताळणीत समोर आले आहे.
मतदारांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या मोहिमेचा फार्म दिला जाणार आहे. तो फार्म प्रत्येक मतदारांनी भरून द्यावा, असे आवाहन खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकारी तथा हवेली तालुका तहसीलदार अर्चना निकम यांनी केले आहे. सोमवारपासून (दि. २९) ही मोहीम प्रत्यक्ष सुरू होणार असून, ती २९ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत नियुक्त कर्मचारी घराघरांत जाऊन मतदारांना अर्ज उपलब्ध करून देणार आहेत.
मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी व हवेली विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने व निकम यांच्या देखरेखीखाली सर्व मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदारसंघात सध्या ५ लाख ९८ हजार मतदार आहेत. ७० टक्के भाग शहरी, तर ३० टक्के भाग ग्रामीण आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच महापालिका तसेच विधानसभा निवडणुकीत दोनपेक्षा अधिक मतदार संघाच्या यादीत नावे असलेल्या मतदारांची संख्या खडकवासला मतदारसंघात अधिक आहे.
महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक असते. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी होते. या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या मतदारांकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोहीम राबवूनही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमीच असते.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात ५ लाख ९८ हजार मतदार आहेत. त्यापैकी जवळपास पावणे दोन ते दोन लाख मतदार दुबार, नावे आहेत. मात्र, मतदार पत्यावर नाहीत. त्यामुळे मतदार पुनर्निरिक्षण मोहिमेत जवळपास दोन लाख मतदारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे.
अर्चना निकम, सहायक निवडणूक अधिकारी, खडकवासला विधानसभा मतदारसंघ