पुणे

सत्तांतरानंतर साखर संग्रहालयाला खीळ; निविदा धारकांची निवड रखडली

अमृता चौगुले

पुणे : साखर आयुक्तालयाच्या परिसरात उभारण्यात येणार्‍या जागतिक दर्जाच्या साखर संग्रहालयाच्या कामाला राज्यातील सत्तांतरानंतर खीळ बसली आहे. याबाबतचा कोणताच निर्णय पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. सुमारे 40 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता असलेल्या साखर संग्रहालयासाठी प्राप्त निविदाधारकांची निवडही रखडली असून, त्यावर निर्णय कधी होणार? याची उत्सुकता साखर उद्योगात लागून राहिली आहे. राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात साखर उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

त्यादृष्टीने तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी शासनास याबाबतचा प्रस्ताव पाठवून महत्त्वाची भूमिका घेतली होती. साखर उद्योगाविषयी ऊस उत्पादन, साखर, गूळ, खांडसरी उत्पादन तसेच साखरेपासून तयार होणार्‍या उपपदार्थांमध्ये मद्यार्क, इथेनॉल, कंपोस्ट खत, सहवीज कॉम्प्रेस्ड बायोगॅस, ऑक्सिजन, सीओ 2 आणि मिथेननिर्मिती होते.

त्याबाबतची संपूर्ण माहिती देशातील शेतकरी, पर्यटक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय पुण्यातील शिवाजीनगर येथील साखर आयुक्तालय परिसरात उभारण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात 22 सप्टेंबर 2021 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील सत्ताबदलानंतर त्यावर कोणताच अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

प्रस्तावित साखर संग्रहालयासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात 15 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ऑनलाइन निविदेत प्राप्त तीनपैकी तांत्रिक निविदेमध्ये दोन निविदा पात्र ठरल्या आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) हे याबाबतच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. तर, सदस्यांमध्ये सहकारमंत्री, सहकार राज्यमंत्री, सहकारचे अपर मुख्य सचिव हे असून, सदस्य सचिव म्हणून साखर आयुक्त आहेत.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीपुढे दोनपैकी एका निविदाधारकाची निवड होणे बाकी आहे. त्यानंतरच साखर संग्रहालयावरील निर्णय पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर साखर संग्रहालयाच्या सद्य:स्थितीवर 31 जुलै रोजी साखर संकुल येथे बैठक झाली असून, त्यांनी हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडण्याबाबत सूचना केल्याचे सांगण्यात आले. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT