पुणे

अकरावीच्या प्रवेशाचे गुर्‍हाळ अखेर संपणार कधी?

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अकरावी प्रवेशासाठी राज्यात 16 ते 30 नोव्हेंबर आणि मुदतवाढीनंतर 2 डिसेंबरपर्यंत विशेष फेरी राबविण्यात आली. तरीदेखील पहिल्यांदा 32 विद्यार्थ्यांनी, आणि आता तब्बल 143 विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी विनंती केली आहे.
संबंधित विद्यार्थ्यांना आता उपसंचालक कार्यालयातूनच प्रवेशासाठी महाविद्यालय दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवेशाचे गांभीर्य नसलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात उपसंचालक कार्यालयात रस असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच महानगर क्षेत्रात अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. संबंधित प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेर्‍या, एक विशेष फेरी, तसेच प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार दोन फेर्‍यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर 223 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळावा, यासाठी विनंती केली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना 16 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर आता 143 विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाकडे प्रवेशासाठी विनंती केल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 74 हजार 194 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून प्रवेशासाठी अद्यापही 39 हजार 292 जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे वारंवार प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देऊनसुद्धा 39 हजारांहून जास्त जागा रिक्त आहेत.प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना प्रवेशाची जाग येत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे योग्य नियोजन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

''उपसंचालक कार्यालयाकडे आणखी 143 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी विनंती केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयस्तरावरूनच महाविद्यालय देऊन त्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे.''

                                                                                                       – मीना शेंडकर, सचिव, अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

SCROLL FOR NEXT