पुणे

पुणे : अपर आयुक्तांसह दोन उपायुक्तांवर वाहतुकीची धुरा

अमृता चौगुले

पुणे : शहरातील वाहतूक विभागाच्या कामाकाजात सुसूत्रता निर्माण व्हावी म्हणून अपर पोलिस आयुक्तांची नियुक्ती वाहतूक विभागात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आणखी एका पोलिस उपायुक्तांचीदेखील नेमणूक तेथे केली जाणार आहे. शहरातील वाहतूक विभागाचे लवकरच दोन विभाग करण्यात येणार असून, पूर्व व पश्चिम या विभागांचे कामकाज हे दोन्ही पोलिस उपायुक्त पाहणार आहेत. तर त्यांच्यावर अपर पोलिस आयुक्तांचे नियंत्रण असणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या हालचाली पोलिस आयुक्तांनी सुरू केल्या आहेत. लवकरच या निर्णयाला गृहविभागाकडून हिरवा कंदील मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे यांच्यावर वाहतूक विभागाची जबाबदारी दिली होती.

शहरातील वाहतुकीची वाढती समस्या, मेट्रोचे कामकाज, रस्त्यावरील खड्डे आणि त्यातच वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेले पुणेकर. पाच ते दहा किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी वाहनचालकांना तासन् तास कोंडीत अडकून पडावे लागत असल्याचे वास्तव शहरातील आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून

पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांपाठोपाठ आता वाहतूक विभागाचाही विस्तार होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. पुणे हे आता 'वाहतूक कोंडीचे शहर' अशी ओळख निर्माण करत आहे. या वाहतूक कोंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा ताफा अडकला होता. तर मर्सिडीज-बेन्झ या कंपनीचे सीईओंसारख्या वरिष्ठ अधिकार्‍यालाही आलिशान गाडीतून उतरून रिक्षाने प्रवास करायला लागल्याच्या घटना ताज्या आहेत.

असाच अनुभव पुणेकरांना रोज येत असताना पुणेकरांसाठी आता वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. पुण्यातील अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असताना बंगळुरु-पुणे महामार्गावर तर वारंवार अपघात होत असतात. त्यातच लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पोलिस ठाणी दीड वर्षापूर्वी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत आली. त्यामुळे वाहतुकीवरदेखील नियंत्रणाची जबाबदारी पोलिस आयुक्तालयाकडे आली आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी आणखी अधिकार्‍यांची गरज भासणार आहे.

पोलिस कर्मचार्‍यांचीही गरज

शहरात नवीन वरिष्ठ अधिकार्‍यांचा प्रस्ताव पाठविला जात असताना शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांची संख्याही वाढवावी लागणार आहे. असे झाले तर शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT