वादळानंतर लिबियात महापूर; ५,००० ठार, १० हजार बेपत्ता | पुढारी

वादळानंतर लिबियात महापूर; ५,००० ठार, १० हजार बेपत्ता

त्रिपोली; वृत्तसंस्था : लिबियाच्या बेंगाझी भागात आलेल्या चक्रीवादळानंतर झालेल्या प्रचंड पावसामुळे दोन धरणे फुटली आणि त्यात किमान ५ हजार हून अधिक जणांचा बळी गेला, तर १० हजार जण बेपत्ता झाले आहेत. अवघ्या १२ तासांत १४४ मि.मी. पाऊस झाल्याने नागरी वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. टेकड्या पाण्याच्या प्रवाहाने कापल्या गेल्या, तर शेकडो वाहने नदीतून वाहत थेट समुद्रकिनार्‍यालाच पोहोचली.

लिबियन सरकार आणि रेड क्रिसेंट संस्था यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर लिबियातील डेर्ना शहराजवळ हा प्रकार घडला. डॅनियल चक्रीवादळाचा लिबियाला फटका बसला. हे वादळ धडकल्यानंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला. प्रामुख्याने वाळवंटी असलेल्या या भागात संपूर्ण सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी ५ ते १२ मि.मी.पर्यंत असते; पण सोमवारी वादळामुळे १२ तासांत तब्बल १४४ मि.मी. पाऊस कोसळला. या पावसाने डेर्ना शहराजवळची दोन धरणे तुडुंब भरली. मागून येणार्‍या पाण्याचा दाब एवढा वाढला की, ही दोन्ही धरणे पाठोपाठ फुटली व त्यातील ३० दशलक्ष घनमीटर पाणी डेर्ना शहरात घुसले. १ लाख लोकसंख्येच्या या शहरात या पुराच्या पाण्याने अक्षरश: मृत्यूचे तांडव केले. शेकडो घरे पडली, वाहने वाहून गेली. या पुराच्या तडाख्यात किमान ३ हजार लोक मरण पावले असून, १० हजार जण बेपत्ता झाले.

पुराच्या लोंढ्यात शेकडो वाहने वाहून गेली. अनेक वाहने डेर्ना शहराच्या पुढे समुद्रकिनार्‍याला नदीच्या माध्यमातून पोहोचली. याशिवाय, पाण्याच्या शक्तिशाली प्रवाहामुळे अनेक टेकड्या कापल्या गेल्या व तेथील रस्तेच पूर्णपणे वाहून गेले.

युद्धग्रस्त लिबियावर जगाचे अनेक निर्बंध असून, त्यामुळे तेथे आंतरराष्ट्रीय मदत पोहोचण्यास उशीर होत आहे. डेर्ना शहर आणि त्यापुढच्या समुद्रकिनार्‍यापर्यंतच्या भागात जागोजागी मृतदेह, वाहून आलेली घरे, वाहने यांचे अवशेष दिसत आहेत. या भागात मदत व बचावकार्य सुरू झाले असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक सैरावैरा भटकत आहेत.

Back to top button