पुणे

40 टक्के नागरिकांचा जीव लागला टांगणीला; महावितरणकडून वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम अपूर्णच

अमृता चौगुले

शिवाजी शिंदे

पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत झाडांच्या फांद्या पडणे… वीजपुरवठा खंडित होणे… अशा अस्थिर परिस्थितीचा सामना सुमारे 40 टक्के पुणेकरांना पावसाळ्यात करावा लागणार आहे. संपूर्ण पुण्यात भूमिगत वीजवाहिन्या करण्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळेच पुणेकरांवर ही वेळ येणार आहे.

महावितरण वीज कंपनीच्या पुणे परिमंडलात गेल्या काही वर्षांत ओव्हरहेड यंत्रणेतील वीजतारा व खांबांचे जाळे कमी करून दर्जेदार वीजपुरवठा, वीजसुरक्षा, तसेच बिघाडांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांमध्ये जोरदार कामे झाली.

महावितरणने आतापर्यंतच्या विविध योजनांमधून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात उच्च व लघुदाबाच्या तब्बल 6 हजार 352 किलोमीटर लांबीच्या भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण केले आहे. म्हणजेच या दोन्ही शहरांत 58 टक्के भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे, असा दावा महावितरणने केला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महावितरणचे 30 लाख वीजग्राहक आहेत. महावितरणने गेल्या 10 वर्षांपासून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व बळकटीकरणाला वेग दिला आहे. यामध्ये विशेष म्हणजे महावितरणकडून या दोन्ही शहरांमधील योजनांच्या आराखड्यामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

त्यामुळे ओव्हरहेडपेक्षा भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण सद्यस्थितीत अधिक झालेले आहे. सोबतच पुणे महानगरपालिकेने भूमिगत वीजवाहिन्यांसाठी केवळ महावितरणसाठी खोदकाम शुल्क कमी आकारल्याने भूमिगत वाहिन्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य म़ळिाले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उच्च व लघुदाबाच्या एकूण 11 हजार 14 किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या आहेत. यामध्ये 6 हजार 352 किलोमीटर (57.67 टक्के) भूमिगत, तर 4 हजार 662 किलोमीटर (42.33 टक्के) ओव्हरहेड, असे वीजवाहिन्यांचे प्रमाण आहे. पुणे शहरामध्ये 8 हजार 114 किलोमीटर लांबीच्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांमध्ये 4 हजार 652 किलोमीटर भूमिगत, तर 3 हजार 462 किलोमीटर ओव्हरहेड वाहिन्यांचा समावेश आहे.

तर, पिंपरी व चिंचवड शहरामध्ये 2 हजार 900 किलोमीटर उच्च व लघुदाब वीजवाहिन्यांमध्ये 1 हजार 700 किलोमीटर भूमिगत, तर 1200 किलोमीटर ओव्हरहेड वाहिन्यांचा समावेश आहे. ओव्हरहेड यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाडांचे प्रमाण अधिक असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात.

यामध्ये छोटे प्राणी, पक्ष्यांपासून ते पाऊस, वादळवारा, वीजवाहिनीवर झाड पडणे, फांद्या वीजतारांना स्पर्श करणे, तारा तुटणे, तारांवर फ्लेक्स, पतंग, मांजा व अन्य किरकोळ कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. याउलट भूमिगत वीजवाहिन्यांमुळे तांत्रिक बिघाडांचे प्रमाण कमी असते.

ओव्हरहेड वाहिन्यांच्या तुलनेत भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचा खर्च अधिक असला, तरी त्याचे विविध फायदेदेखील आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी असले, तरी इतर कामांसाठी होणार्‍या खोदकामांमध्ये भूमिगत वीजवाहिनीला तडे जाणे, तुटणे किंवा पाणी साचल्याने भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

ओव्हरहेडच्या तुलनेत भूमिगत वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यास किंवा बिघाड शोधण्यास अधिक वेळ लागतो. बिघाड शोधण्यासाठी केबल टेस्टिंग करावी लागते. तसेच दुरुस्तीचा खर्चही अधिक येतो. तरीही ओव्हरहेडच्या तुलनेत तांत्रिक बिघाडांचे प्रमाण कमी असणे, वीजसुरक्षेसाठी आवश्यक व सौंदर्यीकरणाला प्राधान्य देणार्‍या भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढविण्यासाठी महावितरणने विशेष प्राधान्य दिले आहे.

पावसाळ्यात धोके टाळण्यासाठी…

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दर वर्षी देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. यात प्रामुख्याने उपरी वीजवाहिन्यांना स्पर्श करणार्‍या झाडांच्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे, खांबांचे, उपकेंद्रातील उपकरणांचे पूर्ण अर्थिंग तपासणे व तुटलेल्या अर्थवायर पूर्ववत करणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वाकलेले किंवा गंजलेले वीज खांब, उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्यांना आवश्यकतेनुसार गार्डस् पुरवणे व अस्तित्वात असलेले गार्डिंग सुस्थितीत करणे, तारांमधील झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणार्‍या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे, लघुदाब वीजवाहिनीवर पीव्हीसी स्पेसर्स बसवणे, लघुदाब वितरण पेटीची किरकोळ दुरुस्ती करणे व दरवाजा नसल्यास लावणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची काही कारणे

खांबावरील वीजवाहिन्या
वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पिन किंवा डिस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्त्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो. त्यामुळे खराब झालेले डिस्क व पिन इन्सूलेटर बदलण्यात येत आहेत.

भूमिगत वीजवाहिन्या
भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही, परंतु पावसाला सुरुवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टिंग व्हॅनच्या साह्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढळलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जॉईंट करणे आदी कामे करावी लागतात.

अन्य कारणे
वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT