

कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड येथील नवीन कृष्णा पूल रविवार पासून वाहतुकीसाठी खुला झाला खरा पण अद्याप जुन्या पुलाच्या जोडरस्त्यांची कामे सुरू आहेत. बुधवारी पुलाजवळील ट्रान्सफार्मर बदलण्याचे काम सुरू असल्याने नवीन कृष्णा पुलावर दोन अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती.
जुन्या पुलाच्या जोडरस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे.
त्यामुळे जुन्या पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पुलानजीक असणारा ट्रान्सफार्मर बदलण्याचे काम सुरू होते. शिवाय जुना पूल वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दोन अडीच तास या पुलावरील वाहतूक ठप्प होती.
सकाळी कार्यालयात जाणारा नोकरवर्ग शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एसजीएम कॉलेज पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांनी अक्षरशः दमछाक झाली. नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू राहिल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.