

सातारा : पुढारी वृत्तसेवा
माण तालुक्यातील म्हसवड येथे माणगंगा नदीवरील लिलाव झालेल्या सर्वच वाळू ठेक्यांतून नियम दांडलून राजरोस वाळू उपसा सुरु आहे. संबंधित महसूल अधिकार्यांकडे तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने त्यांनी संगनमत केल्याचे स्पष्ट आहे. सर्व वाळू ठेके बंद करुन ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. विलास चव्हाण यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, म्हसवड येथील माणगंगा नदीवर चालू असणारे सर्व वाळू उपसा ठेके नियम व अटींचे पालन करत नाहीत. यांत्रिकीकरणाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरु आहे. ठेकेदारांनी उत्खननावेळी पर्यावरण नियमांना तिलांजली दिली आहे. याबाबत संबंधित तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकार्यांना माहिती देवूनही त्यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
नियम डावलून अशाचपध्दतीने वाळू उपसा केल्यास नदीपात्राचे मोठे नुकसान झाले आहे. वाळू उपसा करण्याच्या ठिकाणी ठेकेदारांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली नाही. वाळू वाहतूक करणार्या वाहनांना जीपीआरएस सिस्टीम कार्यान्वित केलेली नाही. चोरट्यापध्दतीने मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी केली जात असून शासनाचा महसूल बुडत आहे. या नियमबाह्य वाळू उपशात ठेकेदार व महसूल अधिकार्यांचे संगनमत झाल्याचे दिसून येते. या वाळू ठेक्याची सखोल चौकशी करुन नियमबाह्य वाळू उपसा करणार्या तीनही ठेकेदारांसह महसूल अधिकार्यांवर कारवाई करावी, वाळू ठेकेदारांचे वाळू उपसा परवाने, कब्जेपट्टी रद्द करावी, अशीही मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. विलास चव्हाण यांनी केली आहे.