

सातारा : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून उरमोडी जलाशयाच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात लाल माती उत्खनन सुरू आहे. गाळ उपसण्याचा परवाना काढून काही व्यावसायिक धरण पोखरत आहेत. संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असल्याने या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई व्हावी, अशी मागणी बनघर ग्रामस्थांनी केली आहे.
कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने पाटबंधारे विभागाने लाल मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले असून ही आयती निघालेली लाल माती सातार्यात आणून चढ्या दराने विकली जात आहे. या गौण खनिजची सर्रास लूट सुरु असताना महसूल विभागाकडून मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सातारा तालुक्याच्या पश्चिमेस असलेली धरणे ही गौण खनिज माफियांना मिळालेल्या आयत्या खाणी आहेत. त्यामुळे या धरणांतून निघालेला मुरुम, माती आणि डबर यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरु आहे. संबंधित तलाठी, सर्कल काय करतात? असा सवाल केला जात आहे.
कास प्रमाणेच परळी खोर्यातही हे प्रकार वाढले आहे. गेले अनेक दिवसांपासून उरमोडी जलाशयाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात लाल मातीचे उत्खनन सुरु आहे. यात अनेकजण विनापरवाना मातीचे उत्खनन करत आहेत तर काहीजण परवानगी गाळ उपशाची घेत असून त्याच्या आडून लाल मातीचे उत्खनन केले जात आहे. एका व्यावसायिकाने पाटबंधारे विभागाकडून गाळमाती काढण्याची परवानगी घेतली आहे. वीटभट्टीसाठी 100 ब्रास गाळमाती उचलण्यास अटी शर्ती घालून परवानगी देण्यात आली आहे. मात्र संबंधिताने परवानगी घेतलेल्या परिसरासह अन्य ठिकाणी लाल मातीचे उत्खनन करण्यात आले आहे.
संबंधिताने बुधवारी जेसीबी व डंबरच्या सहाय्याने लाल मातीचे प्रचंड उत्खनन केले आहे. पाटबंधारे विभागाने परवानगी दिली असली तरी उत्खनन करण्यात आलेले क्षेत्र व परवागनी दिलेले क्षेत्र याची तपासणी व्हायला हवी. माती उत्खननासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आले. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून याप्रकरणी महसूल विभागानेही प्रत्यक्ष पाहणी करावी. उत्खनन केलेल्या ठिकाणी पंचनामे करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बनघर ग्रामस्थांनी केली आहे.